पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी

कर्णधार मिताली राजच्या (१०७ चेंडूंत ६३ धावा) सलग पाचव्या अर्धशतकानंतरही भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पराभव पत्करावा लागला. डार्सी ब्राऊनचा भेदक मारा (४/३३) आणि फलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा ९ गडी आणि ५४ चेंडू राखून धुव्वा उडवला.

ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रमी सलग २५व्या विजयाची नोंद करताना दोन गुणांची कमाई केली आहे. भारताने दिलेले २२६ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४१ षटकांतच गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना रॅचेल हेन्स (नाबाद ९३) आणि एलिसा हिली (७७) यांनी २१ षटकांत १२६ धावांची सलामी दिली. हिलीला पूनम यादवने बाद केले. मात्र हेन्सने कर्णधार मेग लॅनिंगच्या (नाबाद ५३) साथीने दुसऱ्या गड्यासाठी १०१ धावांची भागीदारी रचून संघाचा विजय साकारला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला ५० षटकांत ८ बाद २२५ धावाच करता आल्या. वेगवान गोलंदाज ब्राऊनने शफाली वर्मा (८), स्मृती मानधना (१६), पदार्पणवीर यस्तिका भाटिया (३५) आणि दीप्ती शर्मा (९) या चार फलंदाजांना माघारी पाठवले. मितालीने ६३ धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. मात्र तिच्यानंतर रिचा घोषचा (नाबाद ३२) अपवाद वगळता भारताच्या फलंदाज फारसे योगदान देऊ शकल्या नाहीत.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ८ बाद २२५ (मिताली राज ६३, यस्तिका भाटिया ३५; डार्सी ब्राऊन ४/३३) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : ४१ षटकांत १ बाद २२७ (रॅचेल हेन्स नाबाद ९३, एलिसा हिली ७७, मेग लॅनिंग नाबाद ५३)

मितालीच्या २० हजार धावा

मितालीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात एकंदर कारकीर्दीतील २० हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशी अनोखी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कसोटी प्रकारात ६६९, एकदिवसीयमध्ये ७,३६७ आणि ट्वेन्टी-२०मध्ये २,३६४ धावा केल्या आहेत. याशिवाय मितालीने फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानही कायम राखले.