पीटीआय, विशाखापट्टणम : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या (५३ धावांत ५ बळी) भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाने रविवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला ११७ धावांवर रोखले आणि नंतर अवघ्या ११ षटकांत लक्ष्य पूर्ण करत दहा गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. स्टार्कच्या कामगिरीसाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या सामन्यात तीन बळी मिळवणाऱ्या स्टार्कने या सामन्यातही आपली लय कायम राखली. भारताची ही ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी नीचांकी धावसंख्या आहे. आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फारशी अडचण आली नाही. गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या मिचेल मार्शने या वेळी ३६ चेंडूंत सहा चौकार व सहा षटकारांच्या साहाय्याने नाबाद ६६ धावांची खेळी केली. तर, ट्रॅव्हिस हेडने ३० चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ११ षटकांत बिनबाद १२१ धावा करत सहज विजय नोंदवला. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. तिसरा आणि निर्णायक सामना २२ मार्चला चेन्नई येथे खेळण्यात येणार आहे. भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगलेच धारेवर धरले. कोणताही गोलंदाज त्यांच्यासमोर टिकाव धरू शकला नाही.

त्यापूर्वी, स्टार्क, शॉन अ‍ॅबट (३/२३) व नेथन एलिस (२/१३) यांच्या गोलंदाजीसमोर भारताच्या कोणत्याच फलंदाजांचा निभाव लागला नाही. विराट कोहलीने ३५ चेंडूंत ३१ धावा केल्या. तर, अक्षर पटेलने नाबाद २९ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत दोन षटकार मारले. स्टार्कने आपल्या पहिल्या ‘स्पेल’मध्ये सहा षटकांत ३१ धावा देत चार गडी बाद केले. त्याने शुभमन गिल (०), रोहित शर्मा (१३), सूर्यकुमार यादव (०) आणि केएल राहुल (९) यांना माघारी धाडले. भारताने सलग दुसऱ्या सामन्यात खराब सुरुवात केली आणि पहिल्या पाच षटकांतच स्टार्कच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाज अडचणीत दिसले.

गिल पहिल्याच षटकात खाते न उघडताच बाद झाला. यानंतर स्टार्कने कोहली व रोहितची भागीदारीही मोडली. रोहित बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव पायचीत झाला. गेल्या सामन्यातही सूर्यकुमार पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. राहुलला बाद केल्यानंतर भारताची अवस्था ४ बाद ४८ अशी बिकट झाली. अ‍ॅबटने १०व्या षटकांतील पहिल्या चेंडूवर हार्दिक पंडय़ाला (१) बाद केले. कोहली व जडेजाने सहाव्या गडय़ासाठी २२ धावांची भागीदारी रचली. मात्र, एलिसने कोहलीला बाद करत ही भागीदारी मोडीत काढली. एलिसने नंतर जडेजाला (१६) बाद केले. कुलदीप यादव (४), मोहम्मद शमी (०) यांना अ‍ॅबटने बाद केले. मोहम्मद सिराजला (०) माघारी पाठवत स्टार्कने पाचवा बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक

भारत : २६ षटकांत सर्वबाद ११७ (विराट कोहली ३१, अक्षर पटेल नाबाद २९; मिचेल स्टार्क ५/५३, शॉन अ‍ॅबट ३/२३,  नेथन एलिस २/१३) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : ११ षटकांत बिनबाद १२१ (मिचेल मार्श नाबाद ६६, ट्रॅव्हिस हेड नाबाद ५१)

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सामन्यातील पहिल्याच षटकात भारतीय फलंदाज शुभमन गिलला बाद केल्यानंतर संघाने आनंद साजरा केला.यानंतर भारतीय फलंदाजी ढेपाळली.

स्टार्कच्या भेदकतेसमोर आमचे फलंदाज निष्प्रभ – रोहित

विशाखापट्टणम : स्वत:चा नैसर्गिक खेळ खेळण्यापेक्षा स्टार्कच्या भेदकतेसमोर आमचे फलंदाज बाद होत गेले, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली. स्टार्कने ५३ धावांत भारताचा निम्मा संघ गुंडाळताना विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ‘‘ऑस्ट्रेलियाने स्टार्कच्या भेदकतेने सामन्यावर निर्विवाद वर्चस्व राखले. पहिला सामना जिंकल्यावर दुसऱ्या सामन्यात भारतीय निष्प्रभ ठरले. ऑस्ट्रेलियाने दहा गडी राखून विजय मिळवला. भारतीय फलंदाजांनी त्यांच्या गुणवत्तेला न्याय दिला नाही. खेळपट्टी इतकी खराब निश्चित नव्हती,’’ असे रोहित म्हणाला. या पराभवाने कर्णधार रोहित कमालीचा निराश होता. रोहितने स्टार्कच्या गोलंदाजीचेही कौतुक केले. रोहित म्हणाला की,‘‘स्टार्क ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज आहे. गेली अनेक वर्षे तो ऑस्ट्रेलियासाठी आपले योगदान देत आहे. या सामन्यातही त्याने पूर्ण क्षमतेने गोलंदाजी केली. आमच्या फलंदाजांनी त्याच्यासमोर नांगी टाकली. अशा प्रमुख गोलंदाजांविरुद्ध कसे खेळायला हवे हे शिकण्याची गरज आहे.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India australia odi series disappointing defeat for india ysh
First published on: 20-03-2023 at 00:02 IST