भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा व निर्णायक एकदिवसीय सामना आज
पीटीआय, चेन्नई
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारी होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकायची असल्यास भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. विशेषत: मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल.
भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेला पहिला सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. त्यामुळे एकदिवसीय मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत असून चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियमवर होणारा सामना निर्णायक ठरेल. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या ‘आयपीएल’पूर्वी भारतीय संघाचा हा अखेरचा सामना असेल. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात दमदार कामगिरी करत तीन सामन्यांची मालिका जिंकण्याचे ध्येय बाळगून मैदानात उतरेल.
पहिल्या दोन सामन्यांत मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यापुढे भारताची आघाडीची फळी ढेपाळली. स्टार्कने पहिल्या सामन्यात तीन, तर दुसऱ्या सामन्यात पाच भारतीय फलंदाजांना माघारी धाडले. सूर्यकुमार यादव दोनही सामन्यांत स्टार्कच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. स्टार्कचा अतिरिक्त वेग खेळण्यात तो अपयशी ठरला. त्याची बॅट पूर्णपणे खाली येण्यापूर्वीच चेंडू त्याच्या पॅडला लागला आणि दोनही सामन्यांत पहिल्याच चेंडूवर तो माघारी परतला. सूर्यकुमारने गेल्या काही काळात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परंतु एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो अजूनही चाचपडताना दिसतो आहे. त्याने आतापर्यंत २२ एकदिवसीय सामन्यांत केवळ दोन अर्धशतके केली आहेत. गेल्या १० सामन्यांत सात वेळा तो एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्माने पाठिंबा दर्शवल्याने तूर्तास सूर्यकुमारचे स्थान सुरक्षित आहे.
दुसरीकडे, कामगिरीत सातत्य राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना १० गडी आणि तब्बल २३४ चेंडू ठेवून जिंकला होता. या मोठय़ा विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास दुणावला असून त्यांना रोखण्यासाठी भारताला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
आक्रमक सलामीची गरज
चेन्नईची खेळपट्टी संथ आणि फिरकीला अनुकूल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मधल्या षटकांत धावा करणे अवघड जाऊ शकेल. या स्थितीत ‘पॉवर-प्ले’च्या १० षटकांमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलकडून आक्रमक सलामीची भारताला आवश्यकता आहे. विराट कोहलीने दुसऱ्या सामन्यात खेळपट्टीवर टिकाव धरला होता. परंतु त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. त्याला सूर्यकुमार आणि केएल राहुल यांच्याकडून साथ मिळणेही तितकेच गरजेचे आहे. हार्दिक पंडय़ा आणि रवींद्र जडेजा यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू योगदान दिले होते. परंतु दुसऱ्या सामन्यात त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. गोलंदाजीत मोहम्मद शमी आणि सिराज यांच्यावर सुरुवातीच्या षटकांत बळी मिळवण्याची जबाबदारी असेल.
स्टार्क, मार्शवर भिस्त
पहिल्या दोन सामन्यांत गोलंदाजीत मिचेल स्टार्क आणि फलंदाजीत मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियासाठी अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या सामन्यात मार्शच्या अर्धशतकानंतर ऑस्ट्रेलियाची मधली फळी गडगडली, पण दुसऱ्या सामन्यात मधल्या फळीला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला. त्यामुळे या दोघांकडून पुन्हा दमदार कामगिरीची ऑस्ट्रेलियाच्या संघाला अपेक्षा असेल. गोलंदाजीत स्टार्क पूर्णपणे लयीत असून त्याला शॉन अॅबट आणि नेथन एलिस यांची साथ मिळते आहे. लेग-स्पिनर अॅडम झॉम्पाला अजून फारसा प्रभाव पाडता आला नसला, तरी चेन्नईच्या खेळपट्टीकडून मिळणारी मदत त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.
वेळ : दु. १.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)