ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना आज; राहुल, जडेजाच्या कामगिरीकडे नजर
पीटीआय, विशाखापट्टनम : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरेल तेव्हा भारताचे लक्ष्य मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचे असेल. दुसऱ्या लढतीत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करेल. त्याने मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात सहभाग नोंदवला नव्हता. यासह सर्वाच्या नजरा या केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्यावर असतील.
भारताने वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पाच गडी राखून नमवले होते. यामध्ये राहुलने नाबाद ७५ धावांची संयमी खेळी केली होती. राहुलला बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान लय सापडत नव्हती. त्यामुळे त्याला तिसऱ्या व चौथ्या कसोटी सामन्यांत संघाबाहेर राहावे लागले. जडेजाही दुखापतीतून सावरल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी एकदिवसीय सामना खेळत होता. त्याने शुक्रवारी झालेल्या लढतीत नाबाद ४५ धावांची खेळी केली. यासह त्याने गोलंदाजीत ४६ धावा देताना दोन बळी मिळवले. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या वर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक होणार असल्याने लयीत असलेला राहुल आणि पूर्णपणे तंदुरुस्त झालेला जडेजा संघासाठी महत्त्वपूर्ण असतील. तीन सामन्यांच्या मालिकेत निवड समितीला या दोन्ही खेळाडूंच्या प्रगतीचे आकलन करण्यास मदत मिळेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या संघाने शुक्रवारी झालेल्या सामन्यात मिचेल मार्श, कॅमेरून ग्रीन, मार्कस स्टोइनिस आणि ग्लेन मॅक्सवेलच्या रूपात चार अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान दिले होते. त्यामुळे या सामन्यात स्टीव्ह स्मिथ कोणत्या रणनीतीने मैदानात उतरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
भारतीय संघाचा प्रयत्न या सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याचा असेल. मात्र, त्यासाठी भारताला आपल्या फलंदाजीत सुधारणा करणे गरजेचे आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची अवस्था ५ बाद ८३ अशी झाली होती. त्यानंतर राहुल आणि जडेजा यांनी अभेद्य भागीदारी रचताना संघाला विजय मिळवून दिला. रोहित शर्मा संघात आल्यानंतर भारताचा शीर्षक्रम आणखी भक्कम होईल. गेल्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांचा मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीसमोर निभाव लागला नव्हता. स्टार्कने तीन गडी बाद करताना भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. विराट कोहली (४), सूर्यकुमार यादव (०) आणि शुभमन गिल (२०) लवकर माघारी परतले होते. रोहित डावाची सुरुवात करेल तेव्हा इशान किशनला संघाबाहेर राहावे लागू शकते. कोहली व गिलकडूनही संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल, तर सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यास अडचणी येत आहेत. या वर्षी झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांत त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. श्रेयस अय्यर जायबंदी झाल्याने संघाबाहेर आहे. त्यामुळे चौथ्या स्थानाची जबाबदारी तोवर सूर्यकुमारवर असेल.
शमी, सिराजवर गोलंदाजीची मदार
भारताच्या गोलंदाजांनी मुंबईत चांगली कामगिरी केली होती, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही संघाला त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. फिरकीपटू कुलदीप यादवला मात्र, पहिल्या सामन्यात प्रभावित करता आले नाही. तरीही संघ व्यवस्थापन गोलंदाजी फळीत फारसे बदल करणार नाहीत. हार्दिक पंडय़ा तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका पार पाडेल. दुसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही संघांतील वेगवान गोलंदाजांना चेंडू ‘स्विंग’ होण्यास मदत मिळू शकते.
संघ
- भारत : हार्दिक पंडय़ा (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट.
- ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लबूशेन, अॅलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, मिचेल मार्श, मार्कस स्टोइनिस, अॅश्टन एगर, अॅडम झ्ॉम्पा, शॉन अॅबट, मिचेल स्टार्क, नेथन एलिस, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक).
- वेळ : दु. १.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)