ऑस्ट्रेलियाच्या संघात मातब्बर खेळाडूंचा अभाव असल्यामुळे भारतीय संघ ही कसोटी क्रिकेट मालिका ३-० अशा फरकानेजिंकेल, असे मत भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने व्यक्त केले.

‘इनसाइड स्पोर्ट्स’तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हरभजन म्हणाला, ‘‘घरच्या मैदानावर खेळताना भारतीय खेळाडूंची, विशेषत: फिरकी गोलंदाजांची हुकमत असते. या गोलंदाजांच्या षटकांमध्ये आत्मविश्वासाने फटकेबाजी करू शकतील असे महान फलंदाज त्यांच्याकडे नाहीत. स्टीव्ह वॉ, मार्क वॉ यांच्यासारखे अनुभवी फलंदाज तसेच ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न यांच्यासारख्या श्रेष्ठ गोलंदाजांचा त्यांच्याकडे अभाव आहे. हीच भारतासाठी जमेची बाजू आहे. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर हे जरी दिग्गज फलंदाज त्यांच्याकडे सध्या असले तरी त्यांच्यावर प्रभाव पाडण्याची क्षमता आपल्या गोलंदाजांकडे आहे.’’

‘‘भारतीय संघाबरोबरच्या मालिकेपूर्वी किंवा मालिका सुरू असताना ऑस्ट्रेलियाच्या आजी-माजी खेळाडूंकडून विविध प्रकारे भारतीय खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न पूर्वी अतिशय प्रभावीपणे केला जात असे. आता भारतीय खेळाडूही शेरेबाजी करण्याच्या तंत्रात माहीर झाल्यामुळे व त्यांना सडेतोड उत्तर देण्याबाबत चतुर झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून आता असे उद्योग कमी झाले आहेत,’’ असेही हरभजन म्हणाला.

विराट कोहलीच्या कामगिरीचे कौतुक करताना हरभजन म्हणाला, ‘‘आयपीएलच्या पहिल्या स्पर्धेच्या वेळी लालचंद रजपूत यांनी त्याच्या गुणवत्तेविषयी मला कल्पना दिली होती. मात्र त्या वेळी मुंबई इंडियन्स संघ विराटला खरेदी करू शकला नव्हता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला खरेदी केले व तेव्हापासून त्याने सातत्याने आयपीएल स्पर्धा गाजवली आहे. केवळ स्थानिक मैदानांवर नव्हे तर परदेशातील मैदानांवरही अव्वल दर्जाची कामगिरी करण्याबाबत तो माहीर आहे. एकहाती सामना जिंकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.’’