scorecardresearch

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका: भारताकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

तारांकित ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने (३७ धावांत पाच बळी) केलेल्या प्रभावी माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दुसऱ्या डावात नांगी टाकली

r ashwin

पहिल्या कसोटीत एक डाव, १३२ धावांनी विजय; अश्विन, जडेजाचा प्रभावी मारा

पीटीआय, नागपूर

तारांकित ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने (३७ धावांत पाच बळी) केलेल्या प्रभावी माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दुसऱ्या डावात नांगी टाकली आणि पहिला क्रिकेट कसोटी सामना अवघ्या तीन दिवसांच्या आत भारताने एक डाव व १३२ धावांनी जिंकत बॉर्डर-गावस्कर करंडकमध्ये १-० अशी आघाडी मिळवली.

तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात अक्षर पटेल (८४) आणि मोहम्मद शमी (३७) यांच्या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४०० धावा करताना २२३ धावांची निर्णायक आघाडी घेतली. त्याच्या प्रत्युत्तरात आपल्या दुसऱ्या डावात फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने केवळ एका सत्रातच दहा गडी गमावले आणि ३२.३ षटकांतच त्यांचा डाव ९१ धावांवर आटोपला. अश्विनच्या माऱ्यासमोर कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला चमक दाखवता आली नाही. पहिल्या डावात पाच बळी मिळवणाऱ्या रवींद्र जडेजाने दोन आणि शमीने दोन गडी बाद केले. सामन्यातील अष्टपैलू कामगिरीसाठी जडेजाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

त्यापूर्वी, भारताने तिसऱ्या दिवशी ७ बाद ३२१ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. जडेजाला (७०) टॉड मर्फीने बाद केले. यानंतर अक्षर आणि शमीने नवव्या गडय़ासाठी ५२ धावांची भागीदारी रचली. शमीला लायनच्या गोलंदाजीवर स्कॉट बोलँडकडून ६ धावांवर असताना जीवनदान मिळाले. यानंतर शमीने ऑस्ट्रेलियाचा कसोटी सामन्यातील सर्वात प्रभावी गोलंदाज मर्फीला तीन षटकार लगावले. शमी चौथा षटकार मारण्याच्या नादात बाद झाला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने अक्षरला बाद करत भारताचा डाव संपुष्टात आणला.

पहिल्या डावात १७७ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झाली आणि दुसऱ्याच षटकांत अश्विनने उस्मान ख्वाजाला (५) माघारी धाडले. डेव्हिड वॉर्नरला (१०) जास्त काही करता आले नाही. यानंतर मॅट रेनशॉ (२) आणि पीटर हँडस्कोम्बला (६) अश्विनने बाद केले. ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ ५२ धावांतच माघारी परतला होता आणि त्यामुळे सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागण्याची शक्यता प्रबळ झाली. अॅलेक्स कॅरीच्या (१०) रूपात अश्विनने आपला बळी मिळवला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांना अधिक काळ मैदानावर टिकाव धरता आला नाही. दोन्ही संघांमध्ये १७ फेब्रुवारीला दिल्ली येथे दुसरा कसोटी सामना होणार आहे.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ६३.५ षटकांत सर्वबाद १७७
भारत (पहिला डाव) : १३९.३ षटकांत सर्वबाद ४०० (रोहित शर्मा १२०, अक्षर पटेल ८४, रवींद्र जडेजा ७०; टॉड मर्फी ७/१२४, पॅट कमिन्स २/७८)
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ३२.३ षटकांत सर्वबाद ९१ (स्टीव्ह स्मिथ नाबाद २५, मार्नस लबुशेन १७; रविचंद्रन अश्विन ५/३७, रवींद्र जडेजा २/३४, मोहम्मद शमी २/१३)

सामनावीर: रवींद्र जडेजा

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 00:50 IST