दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात; जडेजाचे सामन्यात १० बळी
पीटीआय, नवी दिल्ली
India Australia Test Series डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या प्रभावी माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा पुन्हा निभाव लागला नाही. त्यामुळे भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तीन दिवसांच्या आतच सहा गडी राखून पराभव केला आणि चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. यासह बॉर्डर-गावस्कर करंडक भारताकडेच राहणार हेदेखील सुनिश्चित झाले.
रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी जडेजाविरुद्ध आश्चर्यकारक फटके मारले आणि याची त्यांना किंमत मोजावी लागली. तिसऱ्या दिवशी १ बाद ६१ धावांवरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांवरच संपुष्टात आला. जडेजाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना ४२ धावांत ७ गडी बाद केले. ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच त्याने सामन्यात दोन डावांत मिळून १० बळी मिळवण्याची किमया साधली. त्याला अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनची तोलामोलाची साथ लाभली. अश्विनने दुसऱ्या डावात ५९ धावांत तीन गडी बाद केले.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ झटपट गारद झाल्यानंतर भारतापुढे विजयासाठी ११५ धावांचे आव्हान होते. याचा पाठलाग करताना केएल राहुल (१) पुन्हा अपयशी ठरला. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक शैलीत फलंदाजी करताना २० चेंडूंत तीन चौकार व दोन षटकारांच्या मदतीने ३१ धावांची खेळी केली. तो धावचीत झाल्यानंतर विराट कोहली (२०) आणि श्रेयस अय्यर (१२) यांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही; परंतु आपला १००वा कसोटी सामना खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने (७४ चेंडूंत नाबाद ३१) एक बाजू धरली. त्याला श्रीकर भरतने (२२ चेंडूंत नाबाद २३) उत्तम साथ दिली.
तत्पूर्वी, जडेजा-अश्विनच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. ऑस्ट्रेलियन फलंदाज जवळपास प्रत्येकच चेंडूवर ‘स्वीप’ किंवा ‘रिव्हर्स स्वीप’ मारण्याच्या प्रयत्नात दिसले. याचा फायदा घेत जडेजाने यष्टींना लक्ष्य करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत टाकले. ट्रॅव्हिस हेड (४३) आणि मार्नस लबूशेन (३५) वगळता ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकला नाही.