scorecardresearch

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका :शुभमनचे संयमी शतक

India vs Australia 4th Test Seriesसर्व प्रारूपांत चांगल्या लयीत असलेल्या गिलने २३५ चेंडूंचा सामना करताना १२८ धावा केल्या ज्यामध्ये १२ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे.

shubhman gill

भारताच्या तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद २८९ धावा; कोहलीची अर्धशतकी खेळी

पीटीआय, अहमदाबाद

India vs Australia 4th Test Seriesयुवा सलामीवीर शुभमन गिलचे संयमी शतक आणि अनुभवी विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर शनिवारी आपल्या पहिल्या डावात ३ बाद २८९ धावसंख्येपर्यंत मजल मारली.

सर्व प्रारूपांत चांगल्या लयीत असलेल्या गिलने २३५ चेंडूंचा सामना करताना १२८ धावा केल्या ज्यामध्ये १२ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये गिलचे हे दुसरे शतक असून ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. गिलने कर्णधार रोहित शर्मासह (५८ चेंडूंत ३५ धावा) पहिल्या गडय़ासाठी ७४, चेतेश्वर पुजारासह (१२१ चेंडूंत ४२ धावा) दुसऱ्या गडय़ासाठी ११३ आणि विराट कोहलीसह (१२८ चेंडूंत नाबाद ५९ धावा) तिसऱ्या गडय़ासाठी ५८ धावांची भागीदारी रचली. भारत अजूनही ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या १९१ धावांनी पिछाडीवर आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहलीसोबत रवींद्र जडेजा (५४ चेंडूंत नाबाद १६) खेळत होता. दोघांनीही २० हून अधिक षटकांत ४४ धावा जोडल्या आहेत.

भारताने पहिल्या सत्रात ९३ धावा जोडल्या. मात्र, दुसऱ्या सत्रात त्यांना केवळ ५९ धावाच करता आल्या, कारण चेंडू जुना झाल्यामुळे फलंदाजांना फटके मारणे कठीण जात होते. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने ९४ षटकानंतर नवीन चेंडू घेतला. भारताने तिसऱ्या सत्रात १०१ धावा केल्या; पण सत्रातील अखेरच्या तासात त्यांनी धिमी फलंदाजी केली. गिलला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करताना कोणतीच अडचण आली नाही. गिलने नेथन लायनच्या गोलंदाजीवर आपले शतक पूर्ण केले.

भारताने तिसऱ्या दिवशी बिनबाद ३६ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि पहिल्या सत्रातच रोहितच्या रूपात त्यांना पहिला झटका बसला. त्याला डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुनमनने बाद केले. रोहित फलंदाजी करताना चांगल्या लयीत दिसत होता आणि त्याचे मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर षटकारही लगावला होता. मात्र, रोहितला टिकून खेळता आले नाही. मैदानात आलेला चेतेश्वर पुजारादेखील चांगली खेळी करेल असे वाटत होते. चहापानापूर्वी टॉड मर्फीने त्याला पायचीत करत ऑस्ट्रेलियाला दुसरे यश मिळवून दिले. गिलला अखेरच्या सत्रात लायनने पायचीत करत माघारी पाठवले. कोहलीने स्टार्कच्या गोलंदाजीवर दोन चौकार लगावले. मात्र, जुन्या चेंडूचा सामना करताना फिरकीपटूंसमोर त्याने बचावात्मक खेळ केला. कोहलीने १०७ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १६७.२ षटकांत सर्व बाद ४८०
भारत (पहिला डाव) : ९९ षटकांत ३ बाद २८९ (शुभमन गिल १२८, विराट कोहली खेळत आहे ५९, रवींद्र जडेजा खेळत आहे १६; मॅथ्यू कुनमन १/४३, टॉड मर्फी १/४५)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2023 at 00:15 IST