दुसऱ्या सामन्यात बांगलादेशची पाच धावांनी सरशी; मालिकेत विजयी आघाडी

वृत्तसंस्था, मीरपूर : डाव्या अंगठय़ाला झालेल्या दुखापतीनंतरही फलंदाजीला येत कर्णधार रोहित शर्माने २८ चेंडूंत नाबाद ५१ धावांची खेळी केली. मात्र, त्याच्या झुंजार खेळीनंतरही भारताला दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान बांगलादेशकडून पाच धावांनी हार पत्करावी लागली. बांगलादेशने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग
Mumbai vs Baroda Ranji Trophy Trophy Hardik Tamore century
हार्दिक तामोरेची शतकी खेळी

प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशची अडखळती सुरुवात झाली होती. परंतु, गेल्या सामन्यातील विजयाचा शिल्पकार मेहदी हसन मिराजने (८३ चेंडूंत नाबाद १०० धावा) केलेल्या अप्रतिम खेळीमुळे बांगलादेशने ५० षटकांत ७ बाद २७१ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात भारताचा डाव ५० षटकांत ९ बाद २६६ धावांवर मर्यादित राहिला. भारताची ४२.४ षटकांत ७ बाद २०७ अशी स्थिती होती. त्या वेळी डाव्या अंगठय़ाला पट्टी बांधून रोहित फलंदाजीला आला. त्याने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मुस्तफिझूर रहमानने टाकलेल्या अखेरच्या षटकात भारताला २० धावांची आवश्यकता होती. रोहितने या षटकात दोन चौकार व एक षटकारही मारला. मात्र, अखेरच्या चेंडूवर सहा धावांची गरज असताना रोहित षटकार मारण्यात चुकला आणि बांगलादेशने विजय मिळवला. रोहितने नाबाद ५१ धावांच्या खेळीत तीन चौकार व पाच षटकार मारले.

तत्पूर्वी, या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या बांगलादेशची सुरुवात अडखळती झाली होती. मोहम्मद सिराजने अनामुल हक (११) आणि कर्णधार लिटन दास (७) यांना बाद केले. उमरान मलिकने नजमुल हुसेन शांटोला (२१) माघारी पाठवले. मग ऑफ-स्पिनर वॉशिंग्टन सुंदरने शाकिब अल हसन (८), मुशफिकूर रहीम (१२) आणि अफिफ हुसेन (०) यांना बाद करत बांगलादेशची ६ बाद ६९ अशी अवस्था केली. यानंतर मेहदीने अनुभवी महमदुल्लाच्या (९६ चेंडूंत ७७) साथीने बांगलादेशचा डाव सावरला. या दोघांनी १४८ धावांची भागीदारी रचली. उमरानने महमदुल्लाला बाद करत ही जोडी फोडली. मात्र, मेहदीने एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले शतक साकारताना बांगलादेशला २७० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मेहदीने नाबाद १०० धावांच्या खेळीत ८ चौकार व ४ षटकार मारले.

प्रत्युत्तरात, रोहितच्या अंगठय़ाला दुखापत झाल्यामुळे शिखर धवनच्या साथीने विराट कोहली सलामीला आला. मात्र, विराट (५) आणि धवन (८) झटपट बाद झाले. चौथ्या स्थानावर बढती मिळालेला सुंदर (११) आणि केएल राहुल (१४) यांनाही फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. मग श्रेयस अय्यर (१०२ चेंडूंत ८२) आणि अक्षर पटेल (५६ चेंडूंत ५६) यांनी भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्यांनी १०७ धावांची भागीदारी रचली. हे दोघे बाद झाल्यावर रोहितने झुंज दिली, पण अखेरीस त्याला इतरांची फारशी साथ मिळाली नाही.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : ५० षटकांत ७ बाद २७१ (मेहदी हसन नाबाद १००, महमदुल्ला ७७; वॉशिंग्टन सुंदर ३/३७, उमरान मलिका २/५८) विजयी वि. भारत : ५० षटकांत ९ बाद २६६ (श्रेयस अय्यर ८२, अक्षर पटेल ५६, रोहित शर्मा नाबाद ५१; इबादत हुसेन ३/४५)

रोहित कसोटी मालिकेला मुकणार?

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना रोहितने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर अनामुल हकचा झेल सोडला. यावेळी त्याच्या डाव्या अंगठय़ाला दुखापत झाली आणि त्याला फिजिओंसोबत मैदानाबाहेर जावे लागले. त्यानंतर त्याला ढाका येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्याची क्ष-किरण चाचणी झाली. त्याच्या अंगठय़ाला टाकेही घालावे लागले. अखेर त्याने फलंदाजी केली. मात्र, रोहित तिसरा एकदिवसीय सामना आणि त्यानंतर होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेलाही मुकण्याची दाट शक्यता आहे. ‘‘रोहित मुंबईला परतणार असून दुखापतीबाबत तज्ज्ञांचे मत घेणार आहे,’’ असे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले. मात्र, रोहित कसोटी मालिकेत खेळणार की नाही, हे स्पष्टपणे सांगणे द्रविडने टाळले. तसेच कुलदीप सेन आणि दीपक चहर तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहेत.