अश्विन, अय्यरच्या संयमी खेळामुळे दुसऱ्या कसोटीत बांगलादेशवर ३ गडी राखून मात
पीटीआय, मिरपूर : रविचंद्रन अश्विन (६६ चेंडूंत नाबाद ४२) आणि श्रेयस अय्यर (४६ चेंडूंत नाबाद २९) यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात तीन गडी राखून रोमांचक विजय नोंदवला. भारताने १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी ४ बाद ४५ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, भारताचे तीन गडी लवकर बाद झाल्याने त्यांची अवस्था ७ बाद ७४ अशी बिकट झाली. यानंतर अय्यर आणि अश्विन यांनी आठव्या गडय़ासाठी १०५ चेंडूंत केलेल्या निर्णायक ७१ धावांच्या अभेद्य भागिदारीमुळे भारताला विजय मिळवता आला.
बांगलादेशचा फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजने (६३ धावांत ५ बळी) प्रभावी मारा केला, मात्र त्याला इतर गोलंदाजांची म्हणावी तशी साथ लाभली नाही. या मालिका विजयामुळे भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेतील आपली स्थिती मजबूत केली आहे. भारताने मालिकेतील पहिला कसोटी सामना १८८ धावांनी जिंकला होता.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर फिरकी गोलंदाजांनी आपला प्रभाव पाडण्यास सुरुवात केली. भारताने दिवसाच्या दुसऱ्याच षटकात जयदेव उनाडकटला (१३) गमावले. पहिल्या डावात ९३ धावांची खेळी करणाऱ्या ऋषभ पंतने मैदानात येताच आक्रमक पवित्रा घेतला, मात्र नऊ धावांवर त्याला मिराजने बाद केले. यानंतर मिराजने अक्षर पटेलला (३४) माघारी पाठवत भारताच्या अडचणी वाढवल्या. यानंतर मैदानात असलेल्या अश्विन आणि अय्यर सुरुवातीला संयमाने खेळ केला. यादरम्यान, त्यांनी धावसंख्येत भर घालणे सुरूच ठेवले. ही भागीदारी मोडीत काढण्यासाठी बांगलादेशने आपला मोर्चा वेगवान गोलंदाजांकडे वळवला, मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. अश्विनला जीवदानही मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याने उचलला. अश्विनला सामनावीर, तर चेतेश्वर पुजाराला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
- बांगलादेश (पहिला डाव) : ७३.५ षटकांत सर्वबाद २२७
- भारत (पहिला डाव) : ८६.३ षटकांत सर्वबाद ३१४
- बांगलादेश (दुसरा डाव) : ७०.२ षटकांत सर्वबाद २३१
- भारत (दुसरा डाव) : ४७ षटकांत ७ बाद १४५ (रविचंद्रन अश्विन नाबाद ४२, श्रेयस अय्यर नाबाद २९, अक्षर पटेल ३४; मेहदी हसन मिराज ५/६३, शाकिब अल हसन २/५०)
कुलदीपला बाहेर ठेवण्याबाबत खेद नाही -राहुल
दुसऱ्या डावात कुलदीप यादवची कमतरता जाणवली, मात्र त्याला दुसऱ्या कसोटीसाठी संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाबाबत खेद नसल्याचे भारतीय कर्णधार केएल राहुल म्हणाला. भारताने पहिल्या कसोटी सामन्यात १८८ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात कुलदीपने निर्णायक भूमिका पार पाडली होती. जयदेव उनाडकटच्या रूपात अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याकरता दुसऱ्या सामन्यासाठी संघाबाहेर करण्यात आले. ‘‘मी घेतलेल्या निर्णयाचा खेद नाही. हा निर्णय योग्य होता. या सामन्यात आमच्या वेगवान गोलंदाजांनीही बळी मिळवले आणि त्यांना खेळपट्टीकडून मदत मिळत होती. खेळपट्टीतून त्यांच्या चेंडूंना चांगली उसळीही मिळत होती. आम्ही एकदिवसीय सामन्यातील आमच्या अनुभवावरून हा निर्णय घेतला. या खेळपट्टीवर वेगवान तसेच फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती. आमचा संघ संतुलित होता आणि आमचा निर्णय योग्य असल्याचे मला वाटते,’’ असे राहुल सामना संपल्यानंतर म्हणाला.
भारताचे ‘डब्ल्यूटीसी’ गुणतालिकेतील स्थान भक्कम
दुबई : भारताने रविवारी बांगलादेशविरुद्ध २-० असे निर्भेळ यश साकारताना ‘आयसीसी’ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) गुणतालिकेत ऑस्ट्रेलियानंतर आपले दुसरे स्थान आणखी भक्कम केले आहे. बांगलादेशविरुद्धच्या विजयामुळे भारताने सलग दुसऱ्यांदा ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात पोहोचण्याची आपली दावेदारी मजबूत केली आहे. भारताला ‘डब्ल्यूटीसी’ गुणतालिकेत सरासरी ५८.९३ टक्के गुणांसह आपली स्थिती आणखी मजबूत करण्यास मदत मिळाली. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका भारताला खेळायची आहे. ही मालिका भारताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानी असून त्यांचे सरासरी ७६.९२ टक्के गुण आहेत.