सराव सामन्यात भारताची इंग्लंडवर मात

इशान किशन (७०) आणि के. एल. राहुल (५१) यांच्या फटकेबाज सलामीच्या जोरावर भारताने सोमवारी झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सराव सामन्यात इंग्लंडला सात गडी आणि सहा चेंडू राखून पराभूत केले.

दुबई येथे झालेल्या या सराव सामन्यात इंग्लंडने दिलेले १८९ धावांचे लक्ष्य भारताने १९ षटकांत गाठले. भारताचा उपकर्णधार आणि प्रमुख सलामीवीर रोहित शर्माला या सामन्यासाठी विश्रांती दिल्याने राहुल आणि इशान यांना सलामीला खेळण्याची संधी मिळाली. राहुलने सुरुवातीपासून आक्रमक शैलीत फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांवर दडपण टाकले. त्याने अवघ्या २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, पुढच्याच चेंडूवर त्याला मार्क वूडने बाद केले. कर्णधार विराट कोहलीला (११) फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. पण इशानने आदिल रशिदच्या एकाच षटकात दोन षटकार मारत अर्धशतक झळकावले. त्याने पुढील दोन चेंडूंवर दोन चौकारही मारले. अखेर ७० धावांवर तो नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. अखेर ऋषभ पंत (नाबाद २९) आणि हार्दिक पंड्या (नाबाद १६) यांनी उर्वरित धावा करून भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८८ अशी धावसंख्या उभारली. जेसन रॉय (१७), जोस बटलर (१८) आणि डेविड मलान (१८) हे इंग्लंडचे अव्वल तीन फलंदाज झटपट बाद झाले. मात्र, जॉनी बेअरस्टो (४९) आणि लियाम लिविंगस्टन (३०) यांनी इंग्लंडला सावरले. तर अखेरच्या षटकांत मोईन अलीने अवघ्या २० चेंडूत नाबाद ४३ धावा केल्याने इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारली.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : २० षटकांत ५ बाद १८८ (जॉनी बेअरस्टो ४९, मोईन अली नाबाद ४३; मोहम्मद शमी ३/४०, जसप्रीत बुमरा १/२६) पराभूत वि. भारत : १९ षटकांत ३ बाद १९२ (इशान किशन ७०, के. एल. राहुल ५१; लियाम लिविंगस्टन १/१०)