डर्बी : सलामीवीर स्मृती मानधनाच्या (५३ चेंडूंत ७९ धावा) आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडवर आठ गडी आणि २० चेंडू राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. उभय संघातील तिसरा आणि अंतिम ट्वेन्टी-२० सामना गुरुवारी होणार आहे.

इंग्लंडने दिलेल्या १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. शेफाली वर्मा (१७ चेंडूंत २० धावा) आणि मानधनाने ५५ धावांची सलामी दिली. शर्माला सोफी एक्लेस्टनने बाद करत ही भागीदारी मोडीत काढली. मैदानात आलेल्या डी. हेमलताला (९) जास्त काळ टिकाव धरता आला नाही. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (२२ चेंडूंत नाबाद २९ धावा) साथीने मानधनाने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवत तिसऱ्या गडय़ासाठी निर्णायक अर्धशतकी भागीदारी रचली आणि संघाला १६.४ षटकांत २ बाद १४६ धावसंख्येपर्यंत पोहोचवत विजय मिळवून दिला. 

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीस उतरलेल्या यजमान इंग्लंडने फ्रेया केम्प (३७ चेंडूंत नाबाद ५१ धावा) आणि माइआ बाऊचिर (२६ चेंडूंत ३४ धावा) यांच्या खेळीमुळे  निर्धारित २० षटकांत ६ बाद १४२ धावसंख्येपर्यंत मजल मारली.