जागतिक हॉकी लीग : भारताचा फ्रान्सवर ६-२ ने विजय

सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला एक गोल स्वीकारल्यानंतर आक्रमक खेळ करत भारताने फ्रान्सला ६-२ असे हरवत जागतिक हॉकी लीगमध्ये पाचव्या स्थानासाठी आव्हान कायम राखले. भारताला आता स्पेनशी झुंज द्यावी लागणार आहे. भारताचे खेळाडू स्थिरावण्यापूर्वीच ह्य़ूज जेनेस्टेटने तिसऱ्या मिनिटाला फ्रान्सला आघाडी मिळवून दिली.

सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला एक गोल स्वीकारल्यानंतर आक्रमक खेळ करत भारताने फ्रान्सला ६-२ असे हरवत जागतिक हॉकी लीगमध्ये पाचव्या स्थानासाठी आव्हान कायम राखले. भारताला आता स्पेनशी झुंज द्यावी लागणार आहे.
भारताचे खेळाडू स्थिरावण्यापूर्वीच ह्य़ूज जेनेस्टेटने तिसऱ्या मिनिटाला फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर दुसऱ्या गोलासाठी त्यांना आणखी ६७ मिनिटे वाट पहावी लागली. फ्रान्सचा हा गोल सामना संपण्याच्या काही सेकंदआधी डेरोन्ट सिम्पसनने पेनल्टी कॉर्नरद्वारा केला. त्यादरम्यान भारताने संपूर्ण खेळावर वर्चस्व गाजवत सहा गोलांची भर घालून हा सामना जिंकला. मनदीप सिंगने ५५व्या आणि ६९व्या मिनिटाला गोल केले. आकाशदीप सिंग (१०वे मिनिट), व्ही. आर. रघुनाथ (२८वे मिनिट), एस. व्ही. सुनील (३२वे मिनिट) आणि सरदारा सिंग (४२वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात हातभार लावला.
या सामन्यात दोन्ही संघांनी जोरदार चाली केल्या. भारताच्या तुलनेत फ्रान्सला गोल करण्याच्या अधिक संधी लाभल्या. मात्र त्यांच्या खेळाडूंनी नऊ पेनल्टी कॉर्नरपैकी केवळ एकाच कॉर्नरद्वारा गोल केला. त्या तुलनेत भारताने गोल करण्याच्या बऱ्याच संधींचा लाभ घेतला. तिसऱ्या मिनिटाला माघारी पडल्यानंतर भारताच्या आक्रमणाला धार आली. दहाव्या मिनिटाला सुनीलने दिलेल्या पासवर आकाशदीपने खणखणीत गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पूर्वार्ध संपण्यास सात मिनिटे बाकी असताना रघुनाथने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत गोल केला आणि भारताला २-१ असे आघाडीवर आणले. पूर्वार्धात भारताने आणखी एक गोल करण्यात यश मिळविले. चेंगलेनसेनाच्या पासवर सुनीलने अचूक गोल केला.
उत्तरार्धात सुरुवातीपासून भारताने आक्रमक चालींचा धडाका लावला. ४२ व्या मिनिटाला धरमवीर सिंगच्या पासवर कर्णधार सरदाराने भारताचा चौथा गोल केला. ५५व्या मिनिटाला शिवेंद्र सिंग, धरमवीर सिंग व मनदीप सिंग या त्रिकुटाने जोरदार चाल केली. त्यामध्ये धरमवीरच्या पासवर मनदीपने गोल केला व भारताला ५-१ असे अधिक्य मिळवून दिले. सामना संपण्यास दीड मिनिटे बाकी असताना सुनीलच्या पासवर मनदीपने जोरदार फटका मारून सहावा गोल केला. शेवटची तीस सेंकद बाकी असताना पेनल्टी कॉर्नरवर फ्रान्सच्या सॅम्पसनने गोल केला. दरम्यान, स्पेनने आर्यलडवर १-० असा विजय मिळवित पाचव्या स्थानासाठी आव्हान राखले. त्यांचा हा एकमेव गोल ६० व्या मिनिटाला रॉजर पेद्रोसने केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India beat france 6 2 to play spain for 5th place in hockey world league