Womens Asia Cup 2026 India vs Hongkong China Highlights: भारतीय संघाने महिलांच्या आशिया चषक स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात हाँगकाँग चीन संघाचा मोठा पराभव केला आहे. स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी आणि भारताच्या गोलंदाजांच्या कमालीच्या खेळीच्या बळावर भारताने हाँगकाँग चीन संघाचा तब्बल १३७ धावांनी पराभव केला. भारताच्या या सलग दुसऱ्या विजयासह संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता ६ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा गट-फेरीतील अखेरचा सामना होईल.
या स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान मिळवणारा भारत हा पहिला संघ ठरला. भारताच्या या दणदणीत विजयाचा पाया सलामीवीर स्मृती मानधना हिच्या आक्रमक शतकाने रचला; तिने ६४ चेंडूंत १२४ धावांची खेळी करत संघाला निर्धारित षटकांत १९३ धावांपर्यंत मजल मारून देण्यात मदत केली. १९४ धावांचे कठीण आव्हान पेलताना हाँगकाँगचा संघ सुरुवातीपासूनच दडपणाखाली दिसला आणि भारताच्या गोलंदाजीसमोर सामन्यात पुनरागमन करू शकला नाही.
भारताने दिलेल्या १९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हाँगकाँग संघाची सुरूवात खूप खराब झाली. संघाने दुसऱ्याच षटकात पहिली विकेट गमावली. पॉवरप्लेमध्ये संघ २० धावांचा पल्लादेखील पार करू शकला नाही. हाँगकाँग चीन संघाकडून कर्णधार नताशा मिलेस हिने सर्वाधिक १५ धावांची खेळी केली. याशिवाय सर्व फलंदाज एकेरी आकड्यावर माघारी परतले. १६.२ षटकांत चीनचा संघ ५६ धावांवर सर्वबाद झाला.
भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आणि ती पुन्हा सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचली. याशिवाय नंदिनी शर्मा, श्रीचरणी व प्रेमा रावत यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर अखेरची फलंदाज धावबाद झाल्याने हाँगकाँग संघ अवघ्या ५६ धावांत माघारी परतला.
हाँगकाँग संघाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. स्मृती मानधना व शफाली वर्माच्या जोडीने ७४ धावांची भागीदारी रचली. शफाली २८ धावांवर बाद झाल्यानंतर एका टोकाकडून विकेट्स गमावण्याचा सिलसिला सुरूच राहिला. पण दुसऱ्या टोकाला स्मृती मानधना मैदानावर पाय घट्ट रोवून उभी होती. स्मृतीने या सामन्यात ६४ चेंडूत १४ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने १२४ धावांची खेळी केली. यासह स्मृती महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली.
