भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी

सहा महिन्यांपूर्वी न्यूझीलंडने साऊदम्पटन येथे भारताला नमवून पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाची गदा उंचावली होती. भारताने सोमवारी त्याच विश्वविजेत्या न्यूझीलंडला जणू ‘१४ वे रत्नच’ दाखवले. दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध ३७२ धावांनी सर्वात मोठ्या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेवर १-० असा कब्जा केला.

सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळी १० वाजून १३ मिनिटांनी म्हणजे दिवसाच्या फक्त ४३ मिनिटांच्या खेळात भारताने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातील उर्वरित निम्मा संघ फक्त २७ धावांत तंबूत धाडला. त्यामुळे भारताला मायदेशातील सलग १४व्या मालिका विजयाची नोंद करता आली.

कानपूर कसोटीत विजय निसटल्यानंतर भारताने वानखेडेवर अनुकूल खेळपट्टीची व्यूहरचना आखून दोन्ही डावांतील सरावासह निवड समितीलाही चाचपणीची पुरेशी संधी दिली. सोमवारी ५ बाद १४० धावसंख्येवरून दुसऱ्या डावाला पुढे प्रारंभ करणारे न्यूझीलंडचे फलंदाज दडपणाखालीच जाणवले. जयंत यादवने रचिन रवींद्र, कायले जेमिसन, टिम साऊदी आणि विल्यम समरविल यांना डोके वर काढण्याची संधी न देता तंबूत पाठवले. त्यानंतर हेन्री निकोल्सला (४४) वृद्धिमान साहाद्वारे यष्टीचीत करीत अश्विनने १६७ धावसंख्येवर न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाला पूर्णविराम दिला. अश्विन आणि जयंत यांनी प्रत्येकी चार बळी घेतले. २०१७मध्ये याआधीची कसोटी खेळणाऱ्या जयंतचे १४-४-४९-४ असे प्रभावी पृथक्करण होते.

अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले, तर दोन डावांत अनुक्रमे १५० आणि ६२ धावा करणाऱ्या मयांक अगरवालने सामनावीर पुरस्कार पटकावला. परंतु हा सामना एजाझ पटेलने नोंदवलेल्या डावात १० बळींच्या विक्रमाने संस्मरणीय ठरला. एजाझने दोन डावांत मिळून एकण्ूा ७३.५ षटके गोलंदाजी केली, तर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी एकूण ८४.४ षटके भारतीय गोलंदाजीचा सामना केला.

१४ भारताने मायदेशातील सलग १४वा मालिकाविजय नोंदवला.

३७२भारताचा कसोटी क्रिकेटमधील हा सर्वाधिक धावांचा विजय ठरला़  याआधी २०१५मध्ये भारताने दिल्ली येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३७ धावांनी विजय मिळवला होता.

३७२न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधील हा सर्वाधिक धावांचा पराभव ठरला़  याआधी २००७मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेकडून ३५८ धावांनी पराभव पत्करला होता.

५०कोहली सोमवारी भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील ५० विजयांत समावेश असलेला खेळाडू ठरला. त्याचा १५३ एकदिवसीय आणि ५९ ट्वेन्टी-२० विजयांमध्ये भारतीय संघात समावेश होता.

३००अश्विनने मायदेशामधील कसोटी सामन्यांत ३०० बळींचा टप्पा गाठला. हा पराक्रम करणारा तो अनिल कुंबळे (३५०) नंतर भारतातील दुसरा गोलंदाज ठरला आहे.

९अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये नवव्यांदा मालिकावीर पुरस्कार पटकावून सर्वाधिक पुरस्कारविजेत्यांच्या पंगतीमधील दुसऱ्या क्रमांकावरील जॅक कॅलिसची बरोबरी साधली. मुथय्या मुरलीधरनने सर्वाधिक ११ पुरस्कार पटकावत अग्रस्थान टिकवले आहे.

६६ न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांत अश्विनने सर्वाधिक एकूण ६६ बळी मिळवले आहेत. याआधी भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यांमधील सर्वाधिक एकूण बळींचा विक्रम रिचर्ड हॅडलीच्या (६५ बळी) नावे होता.

‘आयसीसी’ क्रमवारीत भारत पुन्हा अग्रेसर

दुबई : न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशा विजयानंतर भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सोमवारी प्रकाशित झालेल्या ताज्या क्रमवारीत पुन्हा अग्रस्थानी मुसंडी मारली आहे. कानूपरची पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारताने मुंबईच्या कसोटीत न्यूझीलंडला ३७२ धावांनी नामोहरम केले. भारताच्या खात्यावर आता १२४ गुण जमा असून, दुसऱ्या क्रमांकावरील न्यूझीलंडचा संघ (१२१) हा तीन गुणांनी पिछाडीवर आहे.

जागतिक गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत ५८.३३ टक्के विजयाच्या टक्केवारीसह भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने सहा सामन्यांपैकी तीन विजय मिळवले आहेत, एक गमावला आहे, तर दोन सामने अनिर्णित राखले आहेत. या तालिकेत श्रीलंकेचा संघ पहिल्या आणि पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

‘एमसीए’च्या संग्रहालयाला एजाझची खास भेट

जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्या पावलांवर पाऊल टाकत वानखेडे स्टेडियमवरील कसोटीमधील डावात १० बळी घेणारा न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाझ पटेलचा सोमवारी मुंबई क्रिकेट संघटनेकडून (एमसीए) सत्कार करण्यात आला. ‘एमसीए’चे अध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते एजाझला गुणपत्रिका आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यानंतर एजाझनेही या ऐतिहासिक पराक्रमाप्रसंगी परिधान केलेली न्यूझीलंडची जर्सी आणि चेंडू ‘एमसीए’च्या क्रिकेट संग्रहालयासाठी भेट म्हणून दिला.