India vs New Zealand 1st ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथे पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतीय संघासमोर विजयासाठी ३०१ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी दमदार अर्धशतकं झळकावली. तर श्रेयस अय्यरचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. हा सामना भारतीय संघाने ४ गडी राखून आपल्या नावावर केला.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३०१ धावा करायच्या होत्या. आव्हान मोठं होतं. पण भारतीय संघाची बॅटिंग लाईनअप पाहता, फार कठीण नव्हतं. डावाची सुरूवात करताना शुबमन गिल आणि रोहित शर्मा या जोडीने मिळून पहिल्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. रोहित २६ धावा करून माघारी परतल्यानंतर विराटने जबाबदारी स्विकारली आणि गिलसोबत मिळून डाव पुढे नेला. गिल आणि विराटने दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. ज्यात गिलने ५७ धावांचे योगदान दिलं.

विराटला वनडे कारकिर्दीतील ५४ वे शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती. पण तो ९३ धावांवर बाद होऊन माघारी परतला. त्यामुळे त्याचं शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पहिलाच वनडे सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने ४९ धावांची दमदार खेळी केली. हर्षित राणाने २३ चेंडूंचा सामना करत २९ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला. शेवटी केएल राहुलने एक बाजू धरून ठेवली आणि वॉशिंग्टन सुंदरसोबत मिळून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

न्यूझीलंडने ठेवलं ३०० धावांचं आव्हान

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनव्हे आणि हेनरी निकोल्स यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ११७ धावा जोडल्या. २७ वर्षांनंतर न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी भारतात वनडे क्रिकेट खेळताना १०० धावांचा पल्ला गाठला. हेनरी निकोल्सने ६२ धावांची खेळी केली. तर डेवॉन कॉनव्हेने ५६ धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना डॅरील मिशेलने ८४ धावांची खेळी केली. न्यूझीलंडने ५० षटकांअखेर गडी बाद ३०० धावा केल्या.