IND vs PAK Hockey: क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाचं वर्चस्व कायम आहे. आता क्रिकेटनंतर हॉकीमध्येही भारतीय महिला हॉकी संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय महिला संघाने पाकिस्तानला ५५ धावांवर ऑलआऊट करून दमदार विजयाची नोंद केली होती. आता महिलांच्या ज्युनिअर एशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर १९-० ने विक्रमी विजयाची नोंद केली आहे. या संपूर्ण सामन्यात भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला.

या क्वार्टरफायनलच्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या क्वार्टरमध्ये दमदार खेळ करून ५ गोल केले. तर दुसऱ्या क्वार्टरमध्येही ५ गोल करत १०-० ने आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये दमदार खेळ केल्यानंतर दुसऱ्या हाफमध्येही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला पूर्णपणे बॅकफूटवर ठेवलं. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी ३ आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये ६ गोल केले. यासह संपूर्ण सामन्यात एकतर्फी खेळ करून भारतीय संघाने पाकिस्तानवर १९-० ने विजय मिळवला.

या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला एकदाही पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. या सामन्यातील १९ गोल पैकी ११ गोल हे फिल्ड गोल होते. तर ७ गोल हे पेनल्टी कॉर्नरद्वारे करण्यात आले होते. तर सामन्यातील १३ व्या मिनिटाला भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊट मिळाला. या संधीचा फायदा घेत, भारतीय संघाने गोल केला. मुख्य बाब म्हणजे, भारतीय संघातील १३ वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल करून संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. यादरम्यान पुजा मलिकने लागोपाठ ३ गोल करून गोलची हॅट्रिक केली. तिने सामन्यातील २७ व्या, ४९ व्या आणि ५१ व्या मिनिटाला गोल केले.

या सामन्यात भारतीय खेळाडू एकापाठोपाठ एक गोल करत होते, तर दुसरीकडे पाकिस्तानचे खेळाडू एक -एक गोल करण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत होते. पण संपूर्ण सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू एकही गोल करू शकले नाहीत. क्वार्टरफायनलमध्ये पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघाचा पुढील सामना मलेशिया आणि दक्षिण आफ्रिया या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या संघातील विजेच्या संघासोबत होणार आहे.