India vs Pakistan hockey semi final match result: भारतीय पुरुष हॉकी संघाने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या हॉकीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. दोन्ही संघांमधील या रोमांचक सामन्याचा निकाल अगदी शेवटच्या मिनिटाला लागला. त्या शेवटच्या मिनिटात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवून अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं; भारताने हा सामना ४-३ अशा फरकाने जिंकला.
पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताने दमदार सुरुवात करत पहिल्याच सत्रात २-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात ही आघाडी ३-० अशी वाढवल्याने टीम इंडियाची स्थिती अधिकच मजबूत झाली. मात्र, सामन्याच्या उर्वरित भागात भारताचा आक्रमक खेळ कमी आणि पाकिस्तानचा प्रति-आक्रमण (counter-attack) अधिक दिसून आलं, काही वेळातच पाकिस्तानने ३-० ची पिछाडी भरून काढत धावसंख्या ३-३ अशी बरोबरीत आणली.
पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केल्यामुळे सामना बरोबरीत आल्याने उत्कंठा शिगेला पोहोचली आणि दोन्ही संघ वर्चस्व मिळवण्यासाठी धडपडू लागले. दरम्यान, सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला भारताच्या अभिषेक नैन याने गोल करत भारताचा विजय निश्चित केला; हा निर्णायक गोल भारताचा पाकिस्तानविरुद्धचा चौथा गोल ठरला. अभिषेकने विजयी गोल करण्यापूर्वी, हरमनप्रीत सिंग आणि सुखजीत यांनी भारतासाठी तीन गोल केले होते; हरमनप्रीत सिंगने दोन गोल तर सुखजीतने एक गोल केला होता.
भारतीय पुरुष हॉकी संघाने अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत २८ वर्षांनंतर पुन्हा ऐतिहासिक घटना पाहायला मिळाली. १९९८ नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा भारतीय पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे; महिला संघाने उपांत्य फेरीत कोरियाचा पराभव करून फायनल गाठली.
