भारताने ७ विकेट्सने पाकिस्तानवर महिला आशिया चषक सामन्यात शानदार विजय नोंदवला. पाकिस्तानने दिलेल्या ५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने ८.४ षटकांत दणदणीत विजय आपल्या नावे केला. हरमनप्रीत कौरने या ऐतिहासिक सामन्यात विजयी षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने ३ विकेट्स घेतल्या आणि चांगली झुंज दिली. पण त्याशिवाय पाकिस्तानचा उर्वरित संघ भारतासमोर फेल ठरला.
महिला आशिया चषकात भारतीय संघाच्या वर्चस्वपूर्ण कामगिरीचा सामना पाकिस्तानचा संघही करू शकला नाही. उपांत्य फेरीतील स्थान आधीच निश्चित केलेल्या भारतीय संघाने आपला गट-फेरीतील शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्याबाबत मोठी उत्सुकता असली, तरी याचा निकाल मात्र मागील चार सामन्यांसारखाच लागला. पाकिस्तानचा डाव अवघ्या ५५ धावांत गुंडाळल्यानंतर, भारतीय संघाने केवळ ५२ चेंडूंत हे लक्ष्य गाठत ७ गडी राखून विजय मिळवला. अशा प्रकारे, भारतीय संघाने सलग तीन विजयांसह गट-फेरीची सांगता केली.
भारताविरूद्धचा विजयाचा दुष्काळ संपवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न अपयशी ठरला. ऑक्टोबर २०२२ पासून टीम इंडियाविरुद्धचे सर्व चारही सामने पाकिस्तानने गमावले आहेत. फातिमा सनाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाची विजयाची प्रतीक्षा यावेळीही संपली नाही, कारण भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या टप्प्यातच पाकिस्तानला सामन्यातून अक्षरशः बाहेर फेकलं. पाकिस्तानने चांगली सुरूवात केली खरी, पण भारताच्या गोलंदाजांनी त्यांना सतत धक्के देत सामन्याबाहेर केलं.
पाकिस्तानने दिलेल्या अवघ्या ५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३ विकेट्स गमावत ५७ धावा केल्या. शफाली वर्माने पहिल्या चेंडूवर षटकार लगावत दणक्यात सुरूवात केली. पण फातिमा सनाच्या दुसऱ्या षटकात सरळ ड्राईव्ह खेळताना १२ धावांवर झेलबाद झाली. त्याच षटकात प्रतिका रावलदेखील बाद होत माघारी परतली. त्यानंतर चौथ्या षटकात स्मृती मानधनाला फातिमा सनाने पायचीत करत बाद केलं. रिव्ह्यूची सिस्टिम नसल्याने महिलांच्या आशिया चषकात डीआरएस घेतला जात नाही.
नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय आश्चर्यकारक ठरला आणि संघासाठी चांगलाच धक्कादायक ठरला. सलामीच्या जोडीने २७ धावांची सुरुवात करून दिली असली, तरी त्यानंतरच्या फलंदाजांनी केवळ नावापुरतीच फलंदाजी केली. श्री चरणीने ३ विकेट्स दीप्ती शर्माने २, प्रेमा रावतने ३ आणि शफाली वर्माने १ विकेट घेत पाकिस्तानच्या फलंदाजीला सुरूंग लावला. भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ अवघ्या ५५ धावांत सर्वबाद झाला. २७ धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर पाकिस्तानने पुढील नऊ विकेट्स केवळ २८ धावांत गमावल्या. ही पाकिस्तानची आतापर्यंतची सर्वात कमी टी-२० धावसंख्या आहे.
