हरमनप्रीतचा गोलधडाका!

हरमनप्रीत सिंगच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर गतविजेत्या भारताने दक्षिण कोरियाचा ४-१ असा धुव्वा उडवला.

(संग्रहित छायाचित्र)

आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा

भारताचा दक्षिण कोरियावर ४-१ असा दणदणीत विजय

हरमनप्रीत सिंगच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर गतविजेत्या भारताने दक्षिण कोरियाचा ४-१ असा धुव्वा उडवला. या विजयासह भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत विजयाची मालिका कायम राखली.

हरमनप्रीतने पाचव्या मिनिटाला ड्रॅगफ्लिकद्वारे गोल झळकावल्यानंतर ४७व्या आणि ५९व्या मिनिटाला आणखी दोन गोल झळकावत आपली हॅट्ट्रिक साजरी केली. या स्पर्धेत हॅट्ट्रिक झळकावणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. भारताचा दिलप्रीत सिंग आणि पाकिस्तानचा अलीम बिलाल यांनी ही कामगिरी केली आहे. गुरजंत सिंगने १०व्या मिनिटाला एक गोल करत भारताच्या विजयात योगदान दिले.

दक्षिण कोरियाकडून ली सेउंगिलने २०व्या मिनिटाला मैदानी गोल करत एकमेव गोल लगावला. या विजयासह भारताने पाच सामन्यांत १३ गुणांसह आणि २५ गोलफरकांसह अव्वल स्थान प्राप्त केले आहे. चार सामन्यांत १० गुणांसह मलेशिया दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तान सात गुणांसह तिसऱ्या तर जपान चार गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. भारत, मलेशिया, पाकिस्तान आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जपानने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.

मंगळवारी मलेशियाविरुद्ध गोलशून्य बरोबरी पत्करल्यानंतर भारताने दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळ करत प्रतिस्पध्र्यावर दडपण आणण्यास सुरुवात केली. पाचव्या मिनिटालाच मिळालेल्या पेनल्टीकॉर्नरवर हरमनप्रीतने भारताचे खाते उघडले. त्यानंतर दक्षिण कोरियाने बचावावर अधिक भर दिल्यामुळे भारताला कोरियाच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारणे जमले नाही. नवव्या मिनिटाला भारताचा आघाडीवर आकाशदीप सिंगला गोल करण्याची संधी मिळाली होती, पण त्याने मारलेला फटका क्रॉसबारच्या वरून गेला.

हरमनप्रीत आणि गुरजंत यांनी आक्रमक खेळ करत दक्षिण कोरियाच्या गोलक्षेत्रात मजल मारल्यानंतर हरमनप्रीतने युवा आघाडीवीर गुरजंतकडे चेंडू सोपवला. गुरजंतने कोणतीही चूक न करता डाव्या बाजूने चेंडू गोलजाळ्यात ढकलत भारताची आघाडी २-०ने वाढवली. दुसऱ्या सत्रातही भारताने सातत्यपूर्ण आक्रमक खेळ केल्यानंतर दक्षिण कोरियानेही २०व्या मिनिटाला खाते खोलत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारताला चोख उत्तर दिले.

तिसऱ्या सत्राच्या २९व्या सेकंदालाच दक्षिण कोरियाने गोल नोंदवला खरा, पण भारतीय संघाने याविरोधात दाद मागितल्यानंतर त्यांना गोल नाकारण्यात आला. चौथ्या सत्रात हरमनप्रीतने दुसऱ्या पेनल्टीकॉर्नरचे गोलात रूपांतर करत भारताची आघाडी ३-१ने वाढवली. ५९व्या मिनिटाला हरमनप्रीतने दक्षिण कोरियाचा गोलरक्षक किम जिहयेऊन याला चकवून आपली हॅटट्रिक साजरी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

‘‘पेनल्टी कॉर्नरवर मी जो खेळ केला, त्यावर मी बेहद्द खूश आहे. मी माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले, त्यामुळे गोल लगावण्यात मला यश आले,’’ असे हरमनप्रीतने सामना संपल्यानंतर सांगितले. भारताचा उपांत्य फेरीचा सामना शनिवारी रंगणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India beat south korea by 4

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या