India vs Srilanka 1st Test: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाकडून फलंदाजी करताना देवदत्त पडिक्कल आणि ऋषभ पंत चमकले. तर गोलंदाजीत मानव सुथार श्रीलंकेच्या फलंदाजांवर भारी पडला. भारतीय संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २०६ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने ६०० व्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात १६५ धावांनी विजय मिळवला. यासह कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

मानव सुथारच्या १० विकेट्स

श्रीलंकेचा संघ या सामन्यात ३७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. याआधी गॉलच्या मैदानावर चौथ्या डावात इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला गेला नव्हता. त्यामुळे भारतीय संघाचं पारडं सुरुवातीपासूनच जड होतं. भारतीय गोलंदाजांनी चौथ्या दिवशी ४ आणि पाचव्या दिवशी ६ फलंदाजांना बाद करुन श्रीलंकेचा संपूर्ण डाव संपुष्टात आणला. श्रीलंकेकडून धावांचा पाठलाग करताना कर्णधार धनजंय डी सिल्वाने ५९ आणि शेवटी सोनल दिनूशाने एकाकी झुंज देत ८४ धावांची खेळी केली. पण त इतर कुठलाही फलंदाज टिचून फलंदाजी करु शकला नाही. त्यामुळे श्रीलंकेचा डाव अवघ्या २०६ धावांवर आटोपला. या डावात भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मानव सुथारने ५५ धावा खर्च करुन सर्वाधिक ६ गडी बाद केले. तर पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने ७६ धावा खर्च करुन ४ गडी बाद केले होते. यासह दोन्ही डावात मिळून त्याने १० गडी बाद केले.

भारतीय फलंदाजांची दमदार कामगिरी

या सामन्यातील पहिल्या दिवसापासून भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाकडून देवदत्त पडिक्कलने १६७ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ८२ धावांची खेळी करुन संघाची धावसंख्या ४६२ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेचा डाव अवघ्या २८४ धावांवर आटोपला. या डावात सोनलने दमदार शतकी खेळी केली. तर डिकवेला ८० धावा करुन माघारी परतला. या डावात भारतीय संघाने मोठी आघाडी घेतली.

पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेतली होती. पण या डावात भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ऋषभ पंतच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने १९३ धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ धावांचे मोठे आव्हान दिले. पण या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला १६५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.