मुंबई : गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर आणि शुक्रवारी युवा विश्वविजेतेपद पटकवल्यानंतर आता पुरुष टी-ट्वेंटी या आणखी एका विश्वचषक स्पर्धेला भारत शनिवारपासून सामोरा जाईल. नोव्हेंबर ते मार्च अशा पाच महिन्यांत क्रिकेटमधील तिसरे विश्वविजेतेपद कमावण्याची अनोखी संधी भारताला चालून आली आहे.
हरमनप्रीत कौर आणि आयुष म्हात्रे यांच्याप्रमाणे प्रथमच जगज्जेता कर्णधार बनण्यासाठी सूर्यकुमार यादवला टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत सर्वस्व पणाला लावावे लागेल. या स्पर्धेत आजवर कोणत्याच संघाला विश्वविजेतेपद राखता आलेले नाही. तो इतिहास पुसून टाकण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.
बांगलादेश संघाची हकालपट्टी आणि पाकिस्तानी संघाचा भारताविरुद्ध सामन्यावर बहिष्कार या घडामोडींमुळे ही स्पर्धा पहिला चेंडू टाकला जाण्यापूर्वी क्रिकेटेतर कारणांनी चर्चेत राहिली होती. मात्र अमेरिकेविरुद्ध भारताचा आरंभीचा सामना सुरू झाल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीतली ही पहिली विश्वचषक स्पर्धा ठरते, त्यामुळे भारताच्या भविष्याच्या दृष्टीनेही तिच्याकडे पाहिले जाते. अर्थात भविष्य सुरक्षित असल्याची प्रचीती १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे जगज्जेतेपद सहाव्यांदा पटकावून भारताच्या युवकांनी आणून दिलीच आहे.

