आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाची सुमार कामगिरी झाल्यानंतर आता एकेक वादग्रस्त मुद्दे समोर येऊ लागले आहेत. बंगळुरूस्थित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि बीसीसीआय यांच्यात खेळाडूंच्या फिटनेससंदर्भात समन्वय नसल्याचं स्पष्ट झालं आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणाची या दौऱ्यासाठी कशी निवड झाली यावरून वादाला तोंड फुटलं आहे. संघात निवड होण्यासाठी नवे निकष लागू करण्याबाबत बीसीसीआय विचाराधीन आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
सातत्याने दुखापतग्रस्त होणारा हर्षित राणा पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान हर्षितला क्रॅम्पसचा त्रास जाणवला. त्यावेळी त्याचे वजन जास्त असल्याचं जाणवलं. तो गुडघ्याच्या दुखापतीतून पुनरागमन करत होता. हर्षितचं वजन दिलेल्या निकषांपेक्षा चार किलो जास्त असल्याचं संघव्यवस्थापनाने सांगितलं. सेंटर ऑफ एक्सलन्स याबाबत अधिक माहिती असायला हवी होती. ९६ किलोपेक्षा अधिक वजन असून चालणार नाही असं आता हर्षितला सांगण्यात आलं आहे. आता त्याचं वजन ९४ किलो असून, तो पुढच्या आठवड्यात खेळण्यासाठी फिट होईल अशी अपेक्षा आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली तेव्हा त्याचं वजन ९७ किलो होतं असं सूत्रांनी सांगितलं.
यंदा झालेल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत हर्षित दुखापतग्रस्त असल्यामुळे हर्षित खेळू शकला नव्हता. यंदाच्या आयपीएलमध्येही त्याला दुखापतीमुळे सहभागी होता आलं नाही.
गेल्यावर्षी अँड्रियन ले रॉक्स यांनी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच म्हणून पदभार स्वीकारला. फिटनेस निकष म्हणून ब्राँको टेस्ट अनिवार्य करण्यात आलं होतं. पूर्वी यो यो टेस्ट अनिवार्य करण्यात आली होती. आता हा निकष शिथिल करण्यात आला आहे. आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यात भारतीय खेळाडूंच्या फिटनेसचा खरा चेहरा उघड झाला.
गेल्या वर्षभरात संघातील अनुभवी खेळाडूंना फिटनेसबाबत तुलनेने सोपी टार्गेट्स देण्यात आली होती. सेंटर ऑफ एक्सलन्सने हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांना दौऱ्यासाठी हिरवा कंदील दिला होता. संघात नियमित असलेल्या खेळाडूंना नव्या फिटनेस ड्रिलबाबत पुरेशी माहिती देण्यात आली नव्हती. मोहम्मद सिराजला श्रीलंका दौऱ्याआधी याची माहिती देण्यात आली. वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून तो वनडे आणि टी२० संघाचा भाग नव्हता त्यामुळे त्याला याबद्दल माहिती नव्हती.
भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून, दुखापतीमुळे हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी दुखापतग्रस्त असल्याने त्यांची निवड होऊ शकली नाही. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गुडघ्याच्या दुखापतीतून न सावरल्यामुळे तोही या मालिकेत खेळू शकणार नाही. तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा साई सुदर्शन पहिल्या कसोटीत खेळू शकेल याबाबत साशंकता आहे.
