India Boxing 7 Gold Medals World Record CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2026) ग्लासगो येथे भारतीय बॉक्सिंग संघाने इतिहास घडवला. स्पर्धेत १० भारतीय बॉक्सर्सनी पदक निश्चित करत अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यापैकी सात खेळाडूंनी शनिवारी (१ ऑगस्ट) अंतिम सामन्यात विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतीय महिला बॉक्सर्सनी या ऐतिहासिक कामगिरीत मोठा वाटा उचलला. पाच महिला खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं, तर दोन पुरुष बॉक्सर्सनीही अंतिम लढतीत बाजी मारली.

सुवर्णपदक विजेत्या भारतीय खेळाडूंमध्ये साक्षी चौधरी (महिला ५१ किलो), प्रीती पवार (महिला ५४ किलो), जस्मिन लांबोरिया (महिला ५७ किलो), प्रिया घंघास (महिला ६० किलो), अरुंधती चौधरी (महिला ७० किलो), सचिन सिवाच (पुरुष ६० किलो) आणि अंकुश पंघाल (पुरुष ८० किलो) यांचा समावेश आहे. तर जदुमणी सिंह (पुरुष ५५ किलो), लोव्हलिना बोरगोहेन (महिला ७५ किलो) आणि नरेंद्र बरवाल (पुरुष ९० किलोपेक्षा अधिक) यांनी रौप्यपदक पटकावलं.

भारतीय बॉक्सिंग संघाचा विक्रमी पराक्रम

कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात बॉक्सिंगचा समावेश १९३० पासून असला तरी, एका सीझनमध्ये सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकण्याचा विक्रम आता भारताच्या नावावर झाला आहे. भारताने सात सुवर्णपदकांसह हा ऐतिहासिक विक्रम केला असून, ४० वर्षांपूर्वी कॅनडाने केलेला विक्रम मोडीत काढला. त्यानंतर इंग्लंडने या विक्रमाची बरोबरी केली होती. आता भारतीय बॉक्सिंग संघाने सात सुवर्णपदकांच्या विक्रमी कामगिरीसह नवा इतिहास घडवला आहे.

एका कॉमनवेल्थ गेम्स आवृत्तीत बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकणारे देश

  • भारत — ७ सुवर्णपदके — ग्लासगो २०२६
  • कॅनडा — ६ सुवर्णपदके — एडिनबर्ग १९८६
  • इंग्लंड — ६ सुवर्णपदके — गोल्ड कोस्ट २०१८
  • नॉर्दर्न आयर्लंड — ५ सुवर्णपदके — बर्मिंगहॅम २०२२
  • इंग्लंड — ५ सुवर्णपदके — ग्लासगो २०१४
  • इंग्लंड — ५ सुवर्णपदके — मेलबर्न २००६
  • इंग्लंड — ६ सुवर्णपदके — एडिनबर्ग १९८६

ग्लासगो 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय बॉक्सिंग संघाने सात सुवर्णपदके जिंकत एका स्पर्धेत सर्वाधिक गोल्ड मेडल्स जिंकण्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. याआधी हा विक्रम कॅनडा (१९८६) आणि इंग्लंड (२०१८) यांच्या नावावर होता, ज्यांनी प्रत्येकी सहा सुवर्णपदके जिंकली होती. आता भारताने सात सुवर्णपदकांसह बॉक्सिंगच्या कॉमनवेल्थ इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे.

भारताने यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये केवळ स्वतःचा सर्वोत्तम विक्रम मोडला नाही, तर त्यात मोठी सुधारणा केली आहे. याआधी एका आवृत्तीत भारताची सर्वोत्तम कामगिरी तीन सुवर्णपदकांची होती. २०१० (नवी दिल्ली), २०१८ (गोल्ड कोस्ट) आणि २०२२ (बर्मिंगहॅम) या तीनही कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने प्रत्येकी तीन सुवर्णपदके जिंकली होती. मात्र, ग्लासगो २०२६ मध्ये सात सुवर्णपदके जिंकत भारताने आपल्या मागील विक्रमाच्या तुलनेत जवळपास तिप्पट कामगिरी केली.