भारताच्या अंडर-१९ संघाने अंडर-१९ विश्वचषक २०२६च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने अनेक विश्वविक्रम मोडीत काढत अफगाणिस्तानचा सात विकेट्सनी दणदणीत पराभव केला आणि २०२६ अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. ३११ धावांचे आव्हान भारताने ५३ चेंडू राखून यशस्वीरित्या गाठलं. या ऐतिहासिक विजयात एरॉन जॉर्जचे शतक, तर वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्या अर्धशतकांची मोलाची भूमिका राहिली. भारताने फायनलमध्ये धडक मारताच विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

एरॉन जॉर्जने १०५ चेंडूत १०५ धावांची दमदार खेळी साकारली, तर त्याचा सलामी साथीदार वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३३ चेंडूत ६८ धावा करत भारताच्या या विश्वविक्रमी लक्ष्याचा पाया रचला. कर्णधार आयुष म्हात्रेने खराब फॉर्मसंबंधित टीकेला प्रत्युत्तर देत ५९ चेंडूत ६२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या विजयासह भारताने सलग सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करत नवा इतिहास घडवला.

भारत दहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी भारताने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये विजेतेपद पटकावलं, तर २००६, २०१६, २०२० आणि २०२४ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या भारताने सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत पोहोचण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

सर्वाधिक वेळेस अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेची फायनल खेळणारे संघ

भारत – १० वेळा
ऑस्ट्रेलिया – ६ वेळा
पाकिस्तान – ५ वेळा
दक्षिण आफ्रका – ३ वेळा
इंग्लंड – ३ वेळा

भारताच्या अंडर-१९ संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड

भारत अंडर-१९ संघाने ३११ धावांचे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करत अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि यशस्वी रन चेस पूर्ण केला. यासह भारताने २० वर्षांपासून अबाधित असलेला न्यूझीलंडचा विक्रम मोडीत काढला. २००६ मध्ये कोलंबो येथे न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध ३०५ धावांचा पाठलाग केला होता. स्पर्धेच्या ३८ वर्षांच्या इतिहासात, १६ सीझनमध्ये, ३०० हून अधिक धावांचा पाठलाग यापूर्वी कोणत्याही संघाला करता आला नव्हता. विशेष म्हणजे, युथ वनडे इतिहासातील ३००+ धावांचा हा सर्वात वेगवान पाठलाग ठरला आहे. हा विक्रम यापूर्वी १९ वर्षे पाकिस्तानच्या नावावर होता.

युथ वनडे इतिहासात सर्वात जलद ३०० अधिक धावांचा आकडा गाठणारे संघ

१. भारत अंडर-१९ वि. अफगाणिस्तान अंडर १९, ३११ धावांचं लक्ष्य, ५३ चेंडू राखून विजय, हरारे २०२६

२. पाकिस्तान अंडर १९ वि. ऑस्ट्रेलिया अंडर-१९, ३२१ धावांचं लक्ष्य, १९ चेंडू राखून विजय, २००७

३. भारत अंडर १९ वि. इंग्लंड अंडर-१९, ३०६ धावांचं लक्ष्य, ११ चेंडू राखून विजय, टँटन २००२