India World Chess Champions Latest News / मुंबई : पूर्वीचा सोव्हिएत रशिया आणि विद्यमान चीनने हे करून दाखवले. आता भारतालाही संधी आहे. बुद्धिबळात पुरुष आणि महिला जगज्जेते एकाच देशाचे असण्याची किमया आजवर केवळ दोनच देशांना साधली होती. भारत त्या मार्गावर आहे. पण दोम्माराजू गुकेश आणि रमेशबाबू वैशाली या दोघांसमोरचे अंतिम आव्हान खडतर आहे.

गुकेश तर विद्यमान जगज्जेता आहे. या वर्षाच्या अखेरीस त्याच्या जगज्जेतेपदास आव्हान देईल उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव. वैशाली जगज्जेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. पण तिच्या मार्गात उभी आहे चीनची विद्यमान बुद्धिबळ जगज्जेती जू वेनजून. वैशाली आणि सिंदारोव या दोघांनी नुकतीच सायप्रस येथील कँडिडेट्स स्पर्धा जिंकली.

बुद्धिबळामध्ये जगज्जेत्याचा आव्हानवीर ठरवण्यासाठी कँडिडेट्स स्पर्धा घेतली जाते. गेल्या खेपेस ही स्पर्धा गुकेशने जिंकली, त्यामुळे तो त्या वेळचा जगज्जेता चीनच्या डिंग लिरेनचा आव्हानवीर ठरला होता. पुढे लिरेनला हरवून तो जगज्जेताही बनला. वैशाली गेल्या खेपेला उपविजेती ठरली, त्यामुळे तिला जगज्जेतेपदाच्या लढतीत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यावेळी मात्र तिने जिद्दीने खेळून अजिंक्यपद मिळवले आणि तीदेखील जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी सिद्ध झाली.

गुकेशचे जगज्जेतेपद धोक्यात?

जगज्जेता बनल्यापासून गुकेशची लय काहीशी बिघडल्यागत झाली आहे. मुळात तो खरा जगज्जेता नाहीच, अशी मल्लीनाथी माजी जगज्जेता गॅरी कास्पारोव याने अनेक वेळा केली आहे. बुद्धिबळ विश्वातील सर्वांत प्रतिभावान खेळाडू नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने काही वर्षांपूर्वी पारंपरिक प्रकारातील जगज्जेतेपदाचा त्याग केला. या लढतींमध्ये आपल्याला रस नसल्याचे कारण देताना, पुरेशा क्षमतेचे आव्हानवीर निर्माण होत असल्याचेही त्याने अप्रत्यक्षपणे सूचित केले होते. त्याने जगज्जेतेपद सोडल्यानंतर झालेल्या पहिल्याच लढतीमध्ये चीनच्या डिंग लिरेनने रशियाच्या इयान नेपोम्नियाचीचा पराभव केला होता.

नेपोम्नियाची कार्लसनविरुद्धच्या लढतीमध्येही हरला होता. डिंग लिरेन जगज्जेता बनल्यानंतर काही दिवसांनी त्याचा फॉर्म ढासळू लागला. प्रसिद्धीझोताचा आणि अपेक्षांचा ताण त्याला फारसा झेपला नाही आणि काही काळ मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे त्याने कबूल केले होते. त्याने तरीही गुकेशविरुद्धच्या लढतीपर्यंत मानसिक कणखरपणा बऱ्यापैकी आत्मसात केला.

पण डावपेचात्मक तयारी आणि लिरेनपेक्षा कितीतरी अधिक भक्कम मनःस्थिती या जोरावर गुकेशने ती लढत जिंकली आणि तो बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत तरुण; तसेच विश्वनाथन आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय जगज्जेता बनला. डिंग लिरेनप्रमाणे तो मानसिक तणावाची शिकार बनला नाही. पण त्याचा खेळ पूर्वीसारखा धारदार होत नाही हे वास्तव नाकारता येत नाही.

गुकेश २०२४च्या डिसेंबरमध्ये जगज्जेता बनला. त्या वर्षी त्याने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्येही चमक दाखवली होती. पण गतवर्षी त्याच्या खेळातील धार काहीशी कमी होऊ लागली. अनेकदा संधी असूनही तिचे विजयात रूपांतर करण्यात तो कमी पडत होता. काही वेगळे प्रयोग करून पाहिले, पण त्याचाही उपयोग झाला नाही. गुकेश २०२४च्या अखेरीस २७९४ एलो गुणांवर होता. त्याला प्रथमच २८०० एलो गुणांचा टप्पा गाठण्याची संधी होती. पण गतवर्षी सुरुवातीपासून त्याचा खेळ त्याच्या लौकिकास साजेसा फारसा झाला नाही.

गेल्या १५ महिन्यांत त्याच्या एलो गुणांमध्ये २७९४ वरून २७३२ गुणांपर्यंत मोठी घसरण झाली. एके काळी तो जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर होता. आज तो १७व्या स्थानापर्यंत खाली आलेला आहे. त्याच्या खेळामध्ये (या स्तरावर खेळण्याचा विचार केल्यास) काही गंभीर त्रुटी दिसून येतात, असे निरीक्षण मध्यंतरी मॅग्नस कार्लसनने नोंदवले.

या वर्षी जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी ऊर्जा आणि एकाग्रता शाबूत राहावी म्हणून त्याने काही स्पर्धांतून माघार घेतली आहे. नॉर्वे चेस आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाड अशा काही मोजक्याच स्पर्धांमध्ये तो सहभागी होईल. नॉर्वेत त्याची साक्षात कार्लसनशी गाठ पडेल. तर ऑलिम्पियाडमध्ये तो सिंदारोवशी खेळू शकतो.

सिंदारोवचे पारडे जड?

सध्याची स्थिती पाहता गुकेशविरुद्ध जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये सिंदारोवचे पारडे जड असल्याचे अनेकांना वाटते. दोघेही विशीच्या आसपास आहेत. त्या अर्थाने बुद्धिबळाच्या इतिहासातील हे सर्वांत तरुण जगज्जेता-आव्हानवीर द्वंद्व ठरेल. गुकेशची जेथे घसरण झाली, त्याच काळात सिंदारोवचा उदय झाला. वास्तविक उझबेकीस्तानचाच नॉदिरबेक अब्दुससत्तारोव हा त्या देशाची जगज्जेतेपदाची आशा मानला जायचा. मात्र विश्वचषक स्पर्धेतील पराभवामुळे अब्दुससत्तारोवची यंदाची संधी हुकली. उलट ती स्पर्धा सिंदारोवने अनपेक्षितरीत्या जिंकली. त्यानंतर सिंदारोवचा आलेख चढता राहिला.

सिंदारोवने कँडिडेट्स स्पर्धेत सलग तीन डावांमध्ये भारताचा रमेशबाबू प्रज्ञानंद, अमेरिकेचे फॅबियानो करुआना आणि हिकारू नाकामुरा यांना हरवून दाखवले. प्रज्ञानंदला तर त्याने दोन वेळा हरवले. विशेष म्हणजे हे तिघेही कँडिडेट्स अजिंक्यपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण सिंदारोवच्या झपाट्यासमोर त्यांना संधीच मिळाली नाही. सिंदारोवने १४ पैकी १० गुण मिळवत ही स्पर्धा विक्रमी पद्धतीने जिंकली. आज सिंदारोव २७७५ एलो गुणांसह जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.

गुकेश आणि सिंदारोव यांच्यात ४३ गुणांचा फरक आहे. सिंदारोव झटपट चाली रचतो आणि कार्लसन-कास्पारॉवप्रमाणे डावाच्या ओपनिंगमध्येच वर्चस्व मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. याउलट सध्या गुकेश याच स्तरावर चाचपडत आहे. त्यामुळे जगज्जेतेपदाची लढत उद्या झाली, तर सध्याचा फॉर्म आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर सिंदारोव निःसंशय विजयी होऊ शकेल. पण जगज्जेदेपदाची लढत १४ डावांची आणि प्रदीर्घ असते. गुकेशला एका लढतीचा अनुभव आहे. तो निर्णायक ठरू शकतो. त्या आघाडीवर सिंदारोवची बाजू लंगडी ठरते.

वैशाली वि. चीन!

कँडिडेट्स स्पर्धेत खुल्या गटात प्रज्ञानंदकडून अपेक्षा बाळगल्या जात होत्या. पण त्याची बहीण वैशालीने महिलांच्या गटात अनपेक्षित बाजी मारली. विशेष म्हणजे आठही बुद्धिबळपटूंमध्ये तिचे गुणांकन तळाचे होते. तरीदेखील झू जिनर, तान झोंग्यी अशा मातब्बर चिनी बुद्धिबळपटूंसमोर वैशाली धीराने खेळली. तिने पाच विजय मिळवले. भारताची दिव्या देशमुख सुरुवातीस चांगली खेळली, पण नंतर तिची लय हरवली.

जागतिक क्रमवारीत पहिल्या चारही बुद्धिबळपटू चिनी आहेत. गेली दहा वर्षे जगज्जेत्याही चिनी बुद्धिबळपटूच आहेत. विद्यमान जगज्जेती चीन जू वेनजून आठ वर्षांपासून जगज्जेती आहे. वैशालीचे गुणांकन सध्या २४९६ आहे, तर वेनजुनचे २५५९ आहे. वेनजूनला हरवण्यासाठी वैशालीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पण मानसिक कणखरपणा हे वैशालीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ही लढत एकतर्फी नक्कीच होणार नाही.

भारत, चीन, उझबेकीस्तान

गेल्या काही वर्षांत पुरुष बुद्धिबळात भारत आणि उझबेकीस्तान, तर महिलांमध्ये चीन आणि भारतीय बुद्धिबळपटूंनी चमक दाखवलेली दिसून येते. चिनी खेळाडूंसमोर वैशालीने कँडिडेट्स जिंकली. तर गतवर्षी दिव्या देशमुखने विश्वचषक स्पर्धेत बाजी मारली. याशिवाय कोनेरु हम्पी, हरिका द्रोणवल्ली या खेळाडूही चमक दाखवतात. पुरुषांमध्ये गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी, निहाल सरीन या उत्कृष्ट बुद्धिबळपटूंसमोर नॉदिरबेक अब्दुससत्तारोव, जावोखिर सिंदारोव, नॉदिरबेक याकुबोएव या उझबेक बुद्धिबळपटूंनी आव्हान उभे केले आहे. अब्दुससत्तारोव आणि सिंदारोव जागतिक क्रमवारीत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

चेन्नईत चार वर्षांपूर्वी झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये उझबेकीस्तानने सुवर्णपद जिंकले होते. तर हंगेरीत दोन वर्षांपूर्वी झालेल्या ऑलिम्पियाडमध्ये भारताने खुल्या आणि महिला अशा दोन्ही गटांत सुवर्णपदक जिंकून त्या नामुष्कीची सव्याज परतफेड केली होती! जागतिक बुद्धिबळाचा केंद्रबिंदू युरोप-अमेरिकेकडून आशियाकडे सरकल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे. भविष्यातील जगज्जेतेही याच देशातून येतील हेही दिसू लागले आहे.