आशिया चषक ट्वेन्टी-२०
बांगलादेशचा संघ आता लिंबू-टिंबू प्रकारात गणला जात नाही. भारताने काही महिन्यांपूर्वी याची अनुभूती घेतली आहे. त्यामुळेच बुधवारी बांगलादेशविरुद्धचा पहिला ट्वेन्टी-२० सामना म्हणजे सोपा पेपर मानणे चुकीचे ठरेल. पुढील महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताची तयारी अंतिम टप्प्यात असून, याची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पध्रेला सामोरे जाताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या खेळण्याबाबत पसरलेली अनिश्चितता हा भारताच्या चिंतेत भर घालणारा घटक आहे. सोमवारी सराव सत्रात धोनीला पाठदुखी झाली आणि बीसीसीआयला पार्थिव पटेलला बांगलादेशकडे पाचारण करावे लागले.

आशिया चषक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटच्या स्वरूपात खेळवली जाते. परंतु ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा हे प्रमुख आव्हान असल्यामुळे उत्तम सरावाच्या दृष्टीने यंदा ती ट्वेन्टी-२० स्वरूपात होत आहे. ‘‘बदला घेणे हा क्रीडाविश्वामध्ये अतिशय गंभीर शब्द आहे,’’ असे धोनी नेहमी म्हणतो. मोठय़ा संघांवर धक्कादायक विजय मिळवणे ही बांगलादेशची खासियत आहे. गेल्या वर्षी बांगलादेशच्या भूमीत याच मैदानावर झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने १-२ अशी हार पत्करली होती. त्या पराभवाचे उट्टे फेडण्यासाठी भारत उत्सुक आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातील मेलबर्नच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहित शर्मा वादग्रस्तरीत्या बाद झाल्याच्या निर्णयाचे सावटही या सामन्यावर असेल.

गेल्या वर्षीच्या एकदिवसीय मालिकेत डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रेहमानने आपल्या वैविध्यपूर्ण माऱ्याच्या बळावर भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवला होता. मात्र आशिया चषकात रेहमानची गय केली जाणार नाही, असा निर्धार भारताच्या फलंदाजांनी केला आहे.
भारताची ट्वेन्टी-२० विश्वचषकाची तयारी दिमाखात सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर हरवल्यानंतर भारताने मायदेशात श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली. यंदाच्या वर्षांत भारतीय संघ सहा ट्वेन्टी-२० सामने खेळला, यापैकी पाच जिंकला. फक्त पुण्याच्या खेळपट्टीवर भारताने श्रीलंकेविरुद्ध पराभव पत्करला.

भारत आशिया चषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यास, विश्वचषकाआधी आणखी पाच सामन्यांसह भारत एकंदर ११ सामने खेळेल. सध्या धोनीच्या नेतृत्वाखाली क्रिकेटच्या लघुप्रकारात भारतीय संघाला स्थैर्य प्राप्त झाल्याचे दिसते आहे. संघाचा योग्य समतोल साधण्यासाठी जवळपास सर्व खेळाडूंना संधी देण्याची धोनीची योजना आहे.
फलंदाजीत शिखर धवन आणि रोहित शर्मा सलामीला उतरतील, विराट कोहली तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर तिसऱ्या स्थानावर परतेल. ट्वेन्टी-२० विशेषज्ञ सुरेश रैना चौथ्या आणि अनुभवी युवराज सिंग पाचव्या क्रमांकावर खेळेल. मग धोनी सहाव्या, रवींद्र जडेजा सातव्या आणि फटकेबाज हार्दिक पंडय़ा आठव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्यानंतर रविचंद्रन अश्विन, आशीष नेहरा आणि जसप्रीत बुमराह अशी क्रमवारी असू शकेल. बुमराह सोमवारी सरावात सहभागी होऊ शकला नाही.

मागील सहा ट्वेन्टी-२० सामन्यांत अश्विनच्या खात्यावर १३ बळी जमा आहेत. याचीच दहशत प्रतिस्पर्धी संघांवर असेल. विशाखापट्टणम् येथील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ८ धावांत ४ बळी घेतले होते. नेहरा आणि बुमराह यांच्यावर वेगवान माऱ्याची धुरा असेल. अनुभवी नेहरा कठीण परिस्थिती हाताळण्यात वाकबदार आहे, तर बुमराहची गोलंदाजीची शैली फलंदाजांना पेचात पाडते.
गोलंदाजी हे बांगलादेशचे बलस्थान आहे. मुस्ताफिझूर, तस्कीन अहमद आणि अल-अमिन हुसेन यांचे भारतीय फलंदाजांसमोर आव्हान असेल. याशिवाय कर्णधार मश्रफी मुर्तझा आणि अष्टपैलू शाकिब अल हसन यांचा अनुभव बांगलादेशला उपयुक्त ठरेल. माजी कर्णधार मशफिकर रहिम याच्यावरही संघाची मदार आहे. तसेच सौम्या सरकार आणि महमदुल्ला असे गुणी फलंदाज त्यांच्याकडे आहेत.

संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, हार्दिक पंडय़ा, आशीष नेहरा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार, पवन नेगी, पार्थिव पटेल.

बांगलादेश : मश्रफी मुर्तझा (कर्णधार), इम्रूल कायेस, नुरूल हसन, सौम्या सरकार, नासिर हुसेन, शब्बीर रेहमान, महमदुल्ला रियाध, मशफिकर रहिम (यष्टीरक्षक), शकिब अल हसन, अल-अमिन हुसेन, तश्कीन अहमद, मुस्ताफिझूर रेहमान, अबू हैदर, मोहम्मद मिथुन, अराफत सनी.
सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.