भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा किमान एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सध्या भारतीय क्रिकेट नियमन मंडळ म्हणजेच बीसीसीआय क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करत आहेत. करोनाच्या नव्या ओमायक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेमध्येच आहेत. मात्र या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार सामने खेळवले जात असले तरी भारताच्या मुख्य संघाच्या नियोजित दौऱ्यामध्ये ओमाक्रॉनच्या प्रादुर्भावाच्या दृष्टीने बदल करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. भारतीय संघ नियोजित वेळापत्रकानुसार ९ डिसेंबर रोजी चार्टर्ड विमानाने दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. मात्र सध्या या नियोजित वेळपत्रकातील कार्यक्रम आणि डिपार्चर स्थगित करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलीय.

नक्की वाचा >> ओमायक्रॉन : दक्षिण आफ्रिकेत रुग्णसंख्येचा विस्फोट… एका दिवसात दुप्पटीने वाढले रुग्ण

या दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल झाल्यामुळे संघामध्येही बदल होणार आहेत. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सध्या सुरु असणाऱ्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या कालावधीमध्ये निवड समितीची दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी संघ निवड करण्यासाठी बैठक होणार होता. मात्र सध्या बीसीसीआय दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाच्या संपर्कात असून तेथील करोना संसर्गाच्या परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. हे चित्र पूर्ण स्पष्ट झाल्यानंतरच निवड समितीची बैठक घेतली जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये भारतीय संघ तीन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि चार टी-२० सामने खेळणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमधील शेवटचा सामना खेळण्यास नकार दिला होता. संघातील सपोर्टींग स्टाफपैकी काही जणांना करोना संसर्ग झाल्याने संघाने शेवटची कसोटी खेळण्यास नकार दिला होता. इंग्लंडवरुन सर्व भारतीय खेळाडू थेट युएईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयपीएलच्या उर्वरित स्पर्धेसाठी दाखल झाले होते.