नेपाळला नमवून भारत उपांत्य फेरीत दाखल

कारकीर्दीतील केवळ दुसराच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या छांगटे लालिपनघुलाच्या दुहेरी धमाक्यामुळे दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत (सॅफ) भारताने नेपाळचा ४-१ असा सहज पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली आहे.

बिमल मागेरने तिसऱ्याच मिनिटाला नेपाळचे खाते उघडून भारताला दणका दिला होता. मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंनी खेळावर नियंत्रण मिळवा वर्चस्व गाजवले. २६व्या मिनिटाला रॉवलीन बोर्जेसने भारताचे खाते उघडले. भारताचा अव्वल दर्जाचा खेळाडू सुनील छेत्रीने ६८व्या मिनिटाला भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. छांगटेने शेवटच्या दहा मिनिटांमध्ये दोन गोल करीत संघाला सफाईदार विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

नेपाळच्या खेळाडूंनी या सामन्यात प्रारंभीपासूनच जोरदार आक्रमण केले. त्यामध्ये मिळालेल्या संधीचा लाभ घेत बिमलने खणखणीत गोल साकारून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमणाचा धडाका लावला, तरीही पहिला गोल नोंदविण्यासाठी त्यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. २६व्या मिनिटाला बोर्जेसने अप्रतिम गोल केला. पूर्वार्धात १-१ अशी बरोबरी कायम होती.

सामन्याच्या उत्तरार्धातही सुरुवातीला भारताला अपेक्षेइतक्या चांगल्या चाली करता आल्या नाहीत. ६८व्या मिनिटाला भारताच्या होलीचरण नार्झरीने दिलेल्या पासवर छेत्रीने क्षणाचा विलंब न लावता चेंडू गोलमध्ये तटवला. या गोलमुळे नेपाळच्या खेळाडूंवर दडपण आले. ८१व्या मिनिटाला छांगटेने मिळालेल्या संधीचे सोने करीत संघाला ३-१ असे अधिक्य मिळवून दिले. भारतीय संघाकडून गोल करणारा हा सर्वात तरुण खेळाडू ठरला. या गोलवर समाधान न मानता छांगटेने ९०व्या मिनिटाला स्वत:चा दुसरा गोल केला. त्यामुळे भारताला ४-१ असा शानदार विजय मिळवता आला.