ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना गमावणाऱ्या भारतीय संघासमोर बॉक्सिंग डे कसोटी सामन्याआधी संघनिवडीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. सलामीवीर पृथ्वी शॉचा दोन्ही डावांतला सुमार खेळ, विराटचं भारतात परतणं आणि शमीला झालेली दुखापत यामुळे भारतीय संघाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. दुसऱ्या कसोटीसाठी पृथ्वी शॉला संघात स्थान मिळणार नाही असे संकेत मिळत आहेत. परंतू भारतीय संघाचा माजी कसोटीपटू आकाश चोप्राने पृथ्वी शॉला भारतीय संघातलं स्थान नाकारताना त्याला बळीचा बकरा बनवू नका असं वक्तव्य केलं आहे.

अवश्य वाचा – पृथ्वीची निवडच व्हायला नको होती, तो ऑस्ट्रेलियन माऱ्याचा सामना करण्यासाठी तयार नव्हता !

“पृथ्वी शॉला भारतीय संघात स्थान मिळणार नाही, हे जवळपास निश्चीत आहे. त्याची कामगिरी दोन्ही डावांत खराब झाली आहे यात काही वादच नाही. पण पृथ्वी शॉला दुसऱ्या कसोटीसाठी डावलून शुबमन गिलला संधी देता येईल. यानंतर तिसऱ्या कसोटीसाठी रोहित शर्मा पुनरागमन करेल, मग त्यावेळी तुम्ही कोणाला संघाबाहेर बसवाल?? शुबमन गिल आणि पृथ्वी शॉ यांच्यात जो कमी धावा करेल त्याला तुम्हाला बाहेर बसवावं लागेल, किती वेळ तुम्ही हा संगीत खुर्चीचा खेळ करत बसणार आहात?? एखाद्या खेळाडूला पुरेशी संधी मिळाली आहे आणि त्याला अजून संधी देता येणार नाही हे कसं ठरवणार??” आकाश चोप्रा आपल्या यु-ट्यूब चॅनलच्या कार्यक्रमात बोलत होता.

अवश्य वाचा – खराब कामगिरीनंतर चहुबाजूंनी टीका होत असताना पृथ्वी शॉचा सूचक संदेश, म्हणाला…

पृथ्वी शॉला संघ व्यवस्थापन डावलू शकतं, पण खेळभावना कायम राखायची असेल तर बळीचा बकरा शोधू नका. दोन्ही सलामीवीरांनी खराब खेळ केला आहे, त्यात तुम्ही एकाला सोडून एकाला डावलाल तर मग तुम्ही बळीचे बकरे शोधत आहात असं वाटेल. इतरांच्या तुलनेत पृथ्वीने खराब कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याला संघातून डावलण्याचं समर्थन करता येईल. परंतू पहिल्या कसोटीतला पराभव ही सांघिक जबाबदारी असल्याचं आकाश चोप्रा म्हणाला.