होव्ह : सलामीवीर स्मृती मानधना (९९ चेंडूंत ९१ धावा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (९४ चेंडूंत नाबाद ७४) यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय महिला संघाने रविवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर सात गडी आणि ३४ चेंडू राखून मात केली.

इंग्लंडच्या दिलेल्या २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अडखळती सुरुवात झाली. सलामीवीर शफाली वर्मा (१) माघारी परतल्यानंतर मानधना आणि यास्तिक भाटिया (५०) यांनी भारताचा डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ९६ धावांची भागीदारी रचली. यास्तिका बाद झाल्यानंतर मानधनाने हरमनप्रीतच्या साथीने ९९ धावांची भागीदारी रचली. मानधनाचे शतक हुकले, पण भारताने ४४.२ षटकांत आव्हान पूर्ण करत विजय मिळवला.

त्यापूर्वी, ऐलिस डेव्हिडसन-रिचर्डस (नाबाद ५०) आणि डॅनी वॅट (४३) यांच्या खेळींमुळे इंग्लंडने  ७ बाद २२७ अशी धावसंख्या केली. भारताकडून दीप्ती शर्माने (२/३३) प्रभावी मारा केला.