पीटीआय, बर्मिगहॅम : ऋषभ पंतचे (१४६) झुंजार शतक आणि रवींद्र जडेजाच्या (८३*) साथीने केलेल्या २२२ धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे ५ बाद ९८ अशा कठीण स्थितीतून भारताला सावरले. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शुक्रवारी भारताने ७ बाद ३३८ धावा केल्या आहेत.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. परंतु अनुभवी जेम्स अँडरसन आणि मॅथ्यू पॉट्सच्या वेगवान माऱ्यापुढे भारताच्या फलंदाजांची तारांबळ उडाली. अँडरसनने भारताच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूची वाट दाखवली. शुभमन गिल (१७) आणि चेतेश्वर पुजारा (१३) हे दोघेही दुसऱ्या स्लिपमध्ये झ्ॉक क्रॉवलीकडे झेल देऊन माघारी परतले. मग पावसामुळे दुसऱ्या सत्रातील काही मिनिटांचा खेळ वाया गेला. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर पॉट्सने हनुमा विहारीला (२०) पायचीत करून तिसरा हादरा दिला. नंतर पॉट्सने आपल्या पुढच्याच षटकात विराट कोहलीचा (११) त्रिफळा उडवत भारताच्या अडचणीत आणखी भर घातली. श्रेयस अय्यरने (१५) इंग्लंडच्या गोलंदाजांचे दडपण झुगारताना तीन चौकार खेचले. परंतु अँडरसनने यष्टीरक्षक सॅम बिलिंग्जद्वारे त्याला झेलबाद केले.

निम्मा संघ ९८ धावांत माघारी परतल्यानंतर पंत-जडेजा या डावखुऱ्या फलंदाजांनी भारताचा डाव सावरला. पंतने जॅक लीचला चौकार खेचत अर्धशतक, तर स्टुअर्ट ब्रॉडला दुहेरी धावा काढत पाचवे कसोटी शतक साकारले. जो रूटने पंतला बाद करीत ही जोडी फोडली. मग शार्दूल ठाकूर (१) लवकर बाद झाला. पहिल्या दिवसअखेर जडेजा ८३ धावांवर खेळत होता, तर शमीने खाते उघडले नाही़

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ७३ षटकांत ७ बाद ३३८ (ऋषभ पंत १४६, रवींद्र जडेजा खेळत आहे ८३; जेम्स अँडरसन ३/५२, मॅथ्यू पॉट्स २/८५)

१२ अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराला १२व्यांदा बाद केले.

१८ कोहली १८ कसोटी सामन्यांत शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे. त्याने अखेरचे शतक २०१९मध्ये बांगलादेशविरुद्ध झळकावले होते.

  • वेळ : दुपारी ३ वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, टेन ३ (हिंदी)