पीटीआय, नवी दिल्ली
भारताने २०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या यजमानपदापाठोपाठ २०३८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. यासाठी पहिले पाऊल टाकताना अधिकृतपणे ‘स्वारस्य पत्र’ देखील सादर केले आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली असून, हे भारताला जागतिक क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनवण्याच्या धोरणातील हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
‘आयओए’ने अलिकडेच २०३८ च्या खेळांच्या यजमानपदासाठीचे आपले स्वारस्य पत्र आशियाई ऑलिम्पिक परिषदकडे (ओसीए) सोपवले आहे. चीनमधील सान्या शहरात २१ एप्रिल रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. सध्या येथे आशियाई बीच क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. भारताने स्वारस्य पत्र सादर केल्याची आणि त्यावर चर्चा झाल्याच्या वृत्ताला ‘आयओए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुराम अय्यर यांनी दुजोरा दिला आहे. या पुढील तपशील ‘ओसीए’च्या वतीने आपल्याला कळवला जाईल, असेही अय्यर म्हणाले.
या स्पर्धेच्या यजमानपदासाठी दक्षिण कोरियाने २०२१ मध्येच आपली इच्छा व्यक्त केली असून, ग्वांगझो आणि दाएगू या शहरांची नावे त्यासाठी प्रस्तावित केली आहे. याशिवाय मंगोलिया देशानेही आपले स्वारस्य यापूर्वीच दाखवले आहे. अर्थात, या दोन्ही देशांनी अद्याप ‘ओसीए’कडे अधिकृतपणे स्वारस्य पत्र सादर केल्याची माहिती नाही. त्यामुळे सध्या तरी भारत या एकमेव देशाचेच स्वारस्य पत्र आल्याचे सांगितले जात आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा निर्णय आगामी दोन वर्षांत घेतला जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
भारताने यापूर्वी १९५१ आणि १९८२ मध्ये नवी दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांची संख्या ऑलिम्पिकच्या तुलनेत कमी असली, तरीही सहभागी खेळाडूंची संख्या आणि समाविष्ट क्रीडा प्रकारांची संख्या या निकषांवर आशियाई क्रीडा स्पर्धा ही ऑलिम्पिकपेक्षाही मोठी ठरते. चीनमध्ये हांगझो येथे २०२३ मध्ये पार पडलेल्या अखेरच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, ४० विविध क्रीडा प्रकारांमध्ये ११ हजारहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. आगामी स्पर्धा या वर्षी जपानमध्ये आयची-नागोया शहरात होणार आहे. त्यानंतर २०३० मधील स्पर्धा सौदी अरेबियात रियाध आणि २०३४ मधील स्पर्धा कतारमध्ये दोहा येथे होणार आहेत.
पुन्हा एकदा अहमदाबादलाच पसंती ?
भारतात २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गुजरातच्या अहमदाबादमध्ये होणार आहेत. भारताने २०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सादर केलेल्या प्रस्तावात देखील यजमान म्हणून अहमदाबाद शहराचेच नाव दिले आहे. त्यामुळे सहाजिकच २०३८च्या आशियाई क्रीडा स्पर्धा देखील अहमदाबाद मध्येच घेतल्या जातील असे सध्या मानले जात आहे.
