Lovlina Borgohain boxing medal Commonwealth Games 2026 Glasgow India campaign starts: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ (Commonwealth Games) आयोजित केल्या जात आहेत. यंदाच्या या स्पर्धेत १९ पैकी फक्त १० खेळांचा सहभाग असल्याने भारताच्या पदकांच्या संख्येत मोठी घट होणार आहे. पण २३ जुलै रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभापूर्वी भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कॉमनवेल्थ गेम्समधील भारताचं पहिलं पदक निश्चित झालं आहे. पाहूया नेमकं कसं?

यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, रेसलिंग, स्क्वॉश, टेटे, डायव्हिंग, रग्बी, नेमबाजी या मोठ्या स्पर्धांचा समवेश नसणार आहे. त्यामुळे भारताच्या महत्त्वाच्या खेळांतील पदकं आता संघाच्या नावे नसतील. त्यामुळे आता सहभाग असलेल्या इतर खेळांमध्ये भारताच्या खेळाडूंना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. याचदरम्यान आता स्पर्धेपूर्वीच भारताचं एक पदक नक्की झालं आहे.

महिलांच्या ७५ किलो वजनी गटातील बॉक्सिंग प्रकारात लव्हलिना बोरगोहेनचे पदक किमान कांस्य पदक निश्चित झालं आहे. याचं कारण म्हणजे, उपांत्यपूर्व फेरीत तिच्याशी लढणाऱ्या प्रतिस्पर्धीने स्पर्धेतून माघार घेतली आहे; त्यामुळे लव्हलिना थेट उपांत्य फेरीत पोहोचली आणि तिचं पदक पक्कं झालं. सेमीफायनल खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्यपदक दिलं जाणार आहे.

ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय स्टार बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन ही २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तुवालूच्या ताफाकीचा सामना करणार आहे. महिलांच्या ७५ किलो वजनी गटातील हा उपांत्य सामना ३१ जुलै रोजी होणार असून, लव्हलिना अंतिम फेरीत धडक मारेल आणि त्याद्वारे किमान रौप्य पदक निश्चित करेल, अशी मोठी अपेक्षा आहे.

लोव्हलिना बोरगोहेनचे पदक निश्चित झाल्यानंतर, आता सर्वांच्या नजरा भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि वेटलिफ्टिंगमधील स्टार मीराबाई चानू यांच्यावर असतील; या दोघांकडूनही सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा आहे. बर्मिंगहॅम येथे झालेल्या मागील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने २२ सुवर्णपदकांसह एकूण ६१ पदकं जिंकली होती.

यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत केवळ १० खेळांचे सामने आयोजित केले जात आहेत आणि परिणामी, पदकांसाठीच्या स्पर्धांची संख्याही कमी झाली आहे. पदकांची संख्या वाढवणं हे भारतीय पथकासमोरील एक मोठं आव्हान असेल. विविध क्रीडा प्रकारांत भाग घेण्यासाठी भारताचा १२५ खेळाडूंचा संघ २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी गेला आहे. २३ जुलै रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभापूर्वी, ‘लॉन बॉल्स’मधील दोन सामन्यांनी भारतीय मोहिमेची सुरुवात होईल. भारतीय पथक ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, ज्युडो, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, ट्रॅक सायकलिंग, बॉल्स आणि जलतरण या आठ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार आहे.