पीटीआय, नवी दिल्ली : पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझील आणि दोन वेळच्या विजेत्या उरुग्वेविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणे हा आमच्या खेळाडूंसाठी स्वप्नवत अनुभव ठरणार आहे. या सामन्यांमुळे भारतीय फुटबॉलला नवी दिशा मिळेल, असा विश्वास राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक खालिद जमिल यांनी व्यक्त केला.
भारतीय पुरुष फुटबॉल संघ आगामी काळात पनामा (२६ सप्टेंबर), ब्राझील (३ ऑक्टोबर) आणि उरुग्वे (६ ऑक्टोबर) या आघाडीच्या संघांविरुद्ध मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे. हे सामने पुढील वर्षीच्या आशिया चषक पात्रता स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने निर्णायक ठरतील, असे जमिल यांना वाटते.
‘‘भारतीय फुटबॉलसाठी हा निर्णायक टप्पा ठरेल. इतिहासात प्रथमच आपण ब्राझीलविरुद्ध खेळणार आहोत. त्यामुळे सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. भारतीय फुटबॉलची प्रगती हेच आपले ध्येय असले पाहिजे. पुढील वर्षीची आशिया चषक पात्रता ही आमची प्राथमिकता आहे. त्याआधी बलाढ्य संघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी मोठी आणि अत्यंत सकारात्मक बाब आहे,’’ असे जमिल यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले.
ब्राझीलविरुद्धची लढत ही भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील संस्मरणीय घटना ठरणार असल्याचे सांगत जमिल यांनी टीका आणि नकारात्मक चर्चेपासून दूर राहण्याचे आवाहन केले. ‘‘भारतासाठी हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे. आम्हाला चाहत्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. प्रेक्षकांनी शंभर टक्के साथ दिली, तर खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळेल आणि ते चांगली कामगिरी करतील,’’ असे जमिल म्हणाले.
उच्च दर्जाच्या संघांविरुद्ध सामने खेळल्यामुळे भारतीय खेळाडूंच्या क्षमतेचा कस लागेल. हे भारतीय फुटबॉलच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे जमिल म्हणाले. ‘‘ब्राझील आणि उरुग्वेसारख्या संघांविरुद्ध खेळणे खेळाडूंसाठी आणि संपूर्ण संघासाठी अत्यंत उपयुक्त आहे. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वोच्च स्तराचा अनुभव मिळेल. ही केवळ एक पायरी आहे. त्यानंतर अधिक सामने खेळून आत्मविश्वास वाढवणे आवश्यक आहे,’’ असे जमिल यांनी सांगितले.
ब्राझीलविरुद्ध खेळायला मिळणे हा आमच्या संघातील प्रत्येकासाठी मोठा सन्मान आहे. खेळाडू आणि प्रशिक्षक या नात्याने आमच्यासाठी ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. ब्राझील, उरुग्वे आणि पनामा यांच्याविरुद्ध मैत्रीपूर्ण सामने खेळण्याचा निर्णय हा भारतीय फुटबॉलसाठी अत्यंत चांगला उपक्रम आहे. – खालिद जमिल, प्रशिक्षक, भारतीय फुटबॉल संघ
