भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन

बॅडमिंटन क्षेत्रात भारताचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या नंदू नाटेकरांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं

India great badminton player Nandu Natekar passes away
१९५१ ते १९६३ या काळात थॉमस चषक स्पर्धेत ते भारतीय संघाचा भाग होते आणि १६ पैकी १२ सामने जिंकण्यात यशस्वी झाले होते.

अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू आणि १९६० च्या दशकांत भारतीय क्रीडा क्षेत्राला उंचीवर नेणारे नंदू नाटेकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते ८८ वर्षाचे होते. मूळचे सांगलीचे असणाऱ्या नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनमध्ये भारताचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर नेलं होतं. आंतरराष्ट्रीय स्पर्धा मिळवणारे ते भारततील पहिले खेळाडू होते. तसेच भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराचे ते पहिले मानकरी ठरले होते.

नंदू नाटेकर यांनी अन्य खेळांमध्येही प्राविण्य मिळवलं होतं. क्रिकेट, टेनिसमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर देखील चांगली कामगिरी केली होती. भारतीय क्रीडा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्यांमध्ये सर्वात आधी नंदू नाटेकर यांच नाव येते.

ऑल इग्लंड या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारली होती. १९६० च्या दशकात जाहिरात क्षेत्रातही त्यांनी मोठी मजल मारली होती. केसांना लावायच्या एका हेअर क्रीमची पहिली जाहिरात करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनीही नंदू नाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॅडमिंटनपटू श्री. नंदू नाटेकर यांचे निधन दुःखदायक आहे. आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त करणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू व क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कारावर नाव कोरणारे पहिले खेळाडू. नाटेकर कुटुंबीयांच्या दुःखात सहसंवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!” असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही नंदू नाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “महाराष्ट्राचे सुपुत्र आणि बॅडमिंटन क्षेत्रात भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू श्री नंदू नाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली” असे  भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

वयाच्या २० व्या वर्षी खेळले होते पहिला आंतरराष्ट्रीय सामना

नंदू नाटेकर यांनी वयाच्या २० व्या वर्षी १९५३ मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळले होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत बरीच मोठी कामगिरी केली होती. १९५४ मध्ये, त्यांनी ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यानंतर ते या स्पर्धेत कधीही खेळले नाहीत. या स्पर्धेत तो पहिलाच आणि शेवटचा सामना ते खेळले. पण त्यांनी या स्पर्धेत व्हेटेरन्स प्रकारात खेळला आणि १९८०, १९८१ मध्ये दुहेरी प्रकार जिंकला आणि १९८२ मध्ये दुसरे स्थान मिळविले.

थॉमस चषक मध्ये यश

१९५१ ते १९६३ या काळात थॉमस चषक स्पर्धेत ते भारतीय संघाचा भाग होते आणि १६ पैकी १२ सामने जिंकण्यात यशस्वी झाले होते. यावरून एकेरी स्पर्धांमध्ये त्यांच्यां खेळाचा अंदाज बांधला जाऊ शकतो. दुहेरी प्रकारात त्यांनी १६ पैकी आठ सामने जिंकले आणि १९५९, १९६१ आणि १९६३ मध्ये ते संघाचे कर्णधारही होते. त्यांनी पुरुष एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीत राष्ट्रीय स्पर्धाही जिंकल्या होत्या. १९५६ मध्ये क्वालालंपूर येथे आयोजित सेलंगोर आंतरराष्ट्रीय स्पर्धाही त्यांनी जिंकली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India great badminton player nandu natekar passes away abn

ताज्या बातम्या