पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहत भारताला पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा पूर्णपणे अधिकार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय सैन्यावर हल्ला झाला असून त्यामध्ये त्यांच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यात वावग काहीच नाही. अख्तरने एका पाकिस्तानी वृत्त वाहिनीशी बोलत असताना आपली बाजू मांडली.

मात्र याचवेळी शोएबने, हल्ल्यानंतर पाकिस्तानवर टीका करणाऱ्या माजी भारतीय खेळाडूंनाही आपल्या टीकेचं लक्ष्य बनवलं आहे. भारतीय खेळाडू प्रकरणाचं गांभीर्य लक्षात न घेता टीका करत असल्याचं शोएबने म्हटलं आहे. भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले याबद्दल आम्हाला दुःख आहे. मात्र पाकिस्तान हा एक स्वतंत्र देश आहे, त्यामुळे मनात कोणताही दुसरा विचार न आणता आम्ही पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाठीशी आहोत असं अख्तर म्हणाला.

खेळाडूंनी क्रिकेट सोडून राजकारणावर बोलणं टाळलं पाहिजे. ज्या वेळी असे प्रकार घडतात, त्यावेळी दोन्ही देशांमधील बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी क्रिकेट हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे खेळाडूंनी दोन्ही देशांमध्ये वितुष्ट येईल अशी वक्तव्य करणं टाळलं पाहिजे, अख्तर बोलत होता. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळू नये या मागणीला भारतात जोर धरतो आहे. मात्र आयसीसीने वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.