Asian Games 2026 Men Compound Archery Gold Team: भारताच्या तिरंदाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या पुरूष संघाने तिरंदाजीत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. सुरूवातीच दोन गुणांनी पिछाडीवर राहून केल्यानंतर भारताच्या पुरूष संघाने अखेरच्या राऊंडपर्यंत एका गुणाने आघाडी मिळवत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. भारताच्या तिरंदाजांनी सुवर्णपदकाची हॅटट्रिक लगावली आहे. भारताच्या पुरूष संघापूर्वी महिला संघाने व मिस्क्ड प्रकारात सुवर्णपदक पटकावलं होतं.

तिरंदाज साहिल जाधव, कुशल दलाल व गणेशमणी रत्नम या तिघांनी पुरूष संघात भारताला सुवर्णपदक पटकावलं आहे. अंतिम सामन्यात भारतीय पुरुष संघाचा सामना चीनशी झाला आणि तिसऱ्या सेटपर्यंत भारत एका गुणाने पिछाडीवर होते. मात्र, चौथ्या आणि अंतिम सेटमध्ये त्यांनी आघाडी घेतली आणि अखेरीस २३८-२३७ अशा गुणांनी सामना जिंकत सुवर्णपदक आपल्या नावे केलं. तिरंदाजी प्रकारांमधील हे तिसरे सुवर्णपदक पटकावल्यानंतर आता भारताची एकूण सुवर्णपदकांची संख्या १० वर पोहोचून दुहेरी आकडा गाठला आहे; तसेच तिरंदाजीचे आणखी काही प्रकार बाकी असून, त्यातही सुवर्णपदकांची अपेक्षा आहे.

भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील कंपाउंड तिरंदाजीत आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. बुधवारी ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिथा तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांच्या भारतीय महिला संघाने चीनचा २३८-२३४ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. यासह त्यांनी जागतिक विक्रमाची बरोबरी केली. यानंतर चिकिथा तनिपार्थी आणि साहिल जाधव यांनी मिश्र सांघिक स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं. दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात शूट-ऑफमध्ये बाजी मारत भारतीय जोडीने अव्वल स्थान मिळवलं.

पुरुषांच्या सांघिक स्पर्धेतही भारताने सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्यामुळे आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाउंड तिरंदाजीत भारताने टीम इव्हेंटमध्ये अनेक सुवर्णपदकं मिळवत आपली भक्कम कामगिरी आणि या प्रकारातील मोठी ताकद दाखवून दिली आहे.