दुबई : भारतीय संघात असंख्य गुणवान खेळाडूंचा भरणा असून त्यांनी योग्य वेळी परिपक्वता दाखवल्यास आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक आपण नक्कीच जिंकू, असा विश्वास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केला.

‘‘विजेतेपदाची प्रक्रिया फार वर्षांपासूनच सुरू होते. भारताने गेल्या काही वर्षांत ट्वेन्टी-२० प्रकारात सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. संघातील प्रत्येक खेळाडूकडे सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असून फक्त मोक्याच्या क्षणी त्यांनी परिपक्वतेच्या बळावर कामगिरी उंचावणे गरजेचे आहे,’’ असे गांगुली म्हणाला. भारताची २४ ऑक्टोबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. ‘‘अमिरातीतील खेळपट्टय़ांचा अंदाज घेऊन आपला संघ निवडण्यात आला आहे. युवा खेळाडूंसाठी ही सुवर्णसंधी असून कोहली, रोहित यांसारख्या खेळाडूंसह धोनीही मार्गदर्शकाच्या भूमिकेत त्यांना सहाय्य करण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे भारत नक्कीच जेतेपदावर नाव कोरू शकतो,’’ असेही गांगुलीने सांगितले. याव्यतिरिक्त, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज या संघांपासून भारताला प्रामुख्याने सावध राहावे लागेल, असे गांगुलीने नमूद केले.