Ind Vs Eng Test: भारतीय संघाला धक्का; करोनामुळे संघाचा मुख्य सदस्य बाहेर

चौथा कसोटी सामना रंगतदार वळणावर असताना भारताच्या एका सदस्याला करोनाची लागण झाली आहे.

team-india
Ind Vs Eng Test: भारतीय संघाला धक्का; करोनामुळे संघाचा मुख्य सदस्य बाहेर (Source: BCCI)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्याची मालिका सुरु आहे. यापैकी चौथ्या कसोटीचा शेवटचा दिवस असून निर्णायक दिवस आहे. या मालिकेतील तीन सामन्यात १-१ बरोबरी झाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात काय निर्णय येईल? याकडे लक्ष लागलं आहे. दुसरीकडे चौथा कसोटी सामना रंगतदार वळणावर असताना भारताच्या एका सदस्याला करोनाची लागण झाली आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना दहा दिवस क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे पाचव्या कसोटी सामन्यावेळी त्यांचं मार्गदर्शन संघाला मिळणार नाही. पाचवा कसोटी सामना १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर दरम्यान इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफोर्ड क्रिकेट मैदानात होणार आहे.

रवि शास्त्री यांच्यासह भारतीय संघासोबत असलेल्या ४ जणांना आयसोलेट करण्यात आलं आहे. यात गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर, भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांचा समावेश आहे. त्यामुळे आता या सर्वांना चौथ्या कसोटीशिवाय पाचव्या कसोटीला मुकावं लागणार आहे. या सर्वांना हॉटेलमध्ये आयसोलेट करण्यात आलं आहे. रवि शात्री लेटरल फ्लो चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यानंतर त्यांच्यासह ४ जणांना आयसोलेट करण्यात आलं असून त्यांची आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही.

भारत आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यात १-१ ने बरोबरी आहे. या मालिकेतील एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय मिळवला. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला पराभूत करत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. आता दोन्ही संघ चौथ्या कसोटी सामन्यात आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India head coach ravi shastri corona positive rmt