ग्लासगो : अहमदाबादमधील सुसज्ज आणि जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधांमुळे भारताला २०३०च्या शंभराव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याची माहिती राष्ट्रकुल क्रीडा संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) केटी सॅडलेर यांनी दिली. भारताची बोली संघटनेच्या सुधारित आणि कमी खर्चाच्या यजमानपद प्रारूपाशी सुसंगत आहे, असे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताला या ऐतिहासिक खेळांचे यजमानपद बहाल करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याने वाढत्या खर्चामुळे २०२६ च्या स्पर्धा आयोजनातून माघार घेतली होती. त्यानंतर खर्च आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रकुल संघटनेने नवीन धोरण स्वीकारताना क्रीडा प्रकारांची संख्या कमी केली.

‘‘२०३०च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारत आणि नायजेरिया या आमच्या दोन मोठ्या सदस्यांनी स्वारस्य दाखवले होते. भारतात आधीच जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा सज्ज होत्या. त्यामुळे नवीन बांधकामांवर मोठा खर्च करण्याची गरज नव्हती. सरकारची ही गुंतवणूक कौतुकास्पद आहे,’’ असे सॅडलेर म्हणाल्या. २०३०च्या राष्ट्रकुलमध्ये भारताचा पारंपरिक क्रीडा वारसा जगासमोर आणला जाणार आहे.

यामध्ये कबड्डी, खो-खो, मल्लखांब आणि योगासन या देशी खेळांचा समावेश करण्याबाबत सध्या गांभीर्याने विचार सुरू आहे. यजमान देशाच्या संस्कृतीची झलक दाखवतानाच, हे खेळ इतर राष्ट्रकुल देशांमध्येही लोकप्रिय आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय महासंघांसह काम केले जाईल, असे सॅडलेर यांनी नमूद केले.