नवी दिल्ली : भारताला २०२८च्या जागतिक इनडोअर अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. पोलंड येथे गुरुवारी झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही स्पर्धा भुवनेश्वर येथे होईल.

‘‘भारताला २०२८ मध्ये होणार्‍या जागतिक इनडोअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद सोपविण्यात आले आहे,’’ असे जागतिक ॲथलेटिक्सचे उपाध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगिले. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक इनडोअर अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपली दावेदारी उपस्थित केली होती. जानेवारीमध्ये जागतिक ॲथलेटिक्सच्या दोन सदस्यीय पथकाने भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियम परिसरातील अत्याधुनिक इनडोअर सुविधांची पाहणी केली होती.

पोलंडच्या तोरून येथे यंदाची जागतिक इनडोअर ॲथलेटिक्स स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. जागतिक इनडोअर ॲथलेटिक्समध्ये साधारणपणे पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी प्रत्येकी १३ क्रीडा प्रकारांचा समावेश असतो, ज्या तीन दिवसांच्या कालावधीत पार पडतात. या स्पर्धेच्या पोलंडमध्ये होणार्‍या आवृत्तीमध्ये, ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले स्पर्धा प्रथमच आयोजित केली जाईल.