ध्वज विजयाचा उंच धरा रे!

इंग्लंडमधील चॅम्पियन्स करंडक आणि कॅरेबियन बेटांवरील तिरंगी स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय संघाने झिम्बाब्वे दौऱ्यावरसुद्धा आपली विजयी घोडदौड सुरू केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा सेनेने बुधवारी पहिला एकदिवसीय सामना आरामात जिंकला.

इंग्लंडमधील चॅम्पियन्स करंडक आणि कॅरेबियन बेटांवरील तिरंगी स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय संघाने झिम्बाब्वे दौऱ्यावरसुद्धा आपली विजयी घोडदौड सुरू केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा सेनेने बुधवारी पहिला एकदिवसीय सामना आरामात जिंकला. आता आपले हेच वर्चस्व अबाधित राखण्याच्या ईष्रेने शुक्रवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ लढणार आहे.
गुरुवारी कोहलीने कर्णधारपदाला साजेसे शानदार शतक झळकवले आणि त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहा विकेट राखून विजय मिळवला. परंतु या विजयावर समाधान मानण्यापेक्षा भारताला गोलंदाजीच्या प्रांतात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. भारताच्या अननुभवी गोलंदाजीच्या माऱ्यावर झिम्बाब्वेच्या काही फलंदाजांनी जोरदार आक्रमण केले.
झिम्बाब्वेचा सलामीवीर सिकंदर रझाने संयमी खेळी साकारली. परंतु दुर्दैवाने त्याचे शतक हुकले. मधल्या फळीत फलंदाजीला उतरलेल्या एल्टन चिगुम्बुराने अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये आक्रमण करीत अर्धा डझन चौकारांच्या साहाय्याने ३४ चेंडूंत ४३ धावा केल्या. त्यामुळे झिम्बाब्वेला समाधानकारक धावसंख्या उभारता आली.
इशांत शर्मा, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार या वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीमध्ये भारताची मदार आर. विनय कुमारवर होती. परंतु त्याने ९ षटकांमध्ये ५४ धावा दिल्या. फिरकी गोलंदाज अमित मिश्राने १० षटकांमध्ये ३ बळी घेतले. भारताच्या सलामीवीरांना मोठी धावसंख्या रचण्यात अपयश आले. पण त्यानंतर विराट कोहलीने भारताच्या विजयाचा अध्याय लिहिला. अंबाती रायुडूने नाबाद अर्धशतक झळकावून आपले पदार्पण दणक्यात साजरे केले. ही भारतासाठी आणखी एक सकारात्मक गोष्ट ठरली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बरीच वष्रे खेळणाऱ्या रायुडूला अखेर गुरुवारी एकदिवसीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली आणि त्याने तिचे सोने करताना नाबाद ६३ धावांची खेळी केली.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ कायम राहील की फलंदाज चेतेश्वर पुजारा किंवा फिरकी गोलंदाज परवेझ रसूल याला संधी मिळेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
झिम्बाब्वेच्या संघातील फक्त रझा आणि चिगुम्बुरा यांच्याकडूनच प्रतिकार पाहायला मिळाला. बाकीच्या खेळाडूंनी त्यांच्याकडून शिकण्याची आवश्यकता आहे. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना मग कोहलीच्या आक्रमणावर नियंत्रण मिळवणे अवघड गेले. प्रोस्पर उत्सेया हा एकमेव गोलंदाज भारतीय फलंदाजांना डोकेदुखी ठरला.  
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, परवेझ रसूल, शामी अहमद, आर. विनय कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहित शर्मा.
झिम्बाब्वे : ब्रेन्डन टेलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सिकंदर रझा, तेंडई चटारा, मायकेल चिनॉया, एल्टन चिगुम्बुरा, ग्रॅमी क्रेमर, कायले जाव्‍‌र्हिस, टायमीसेन मारूमा, हॅमिल्टन मसाकाझा, नॅटसे म’शांगवे, टिनोटेंडा मुटोम्बोझी, वुसीमुझी सिबांडा, प्रोस्पर उत्सेया, ब्रायन व्हिटोरी, माल्कम वॉलर, सीन विल्यम्स.
सामन्याची वेळ : दुपारी १२.३० वा.पासून.
थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट आणि टेन स्पोर्ट्स.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India in zimbabwe 2013 visitors aim to continue dominance

ताज्या बातम्या