पीटीआय, मलाहाइड : आयर्लंडविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारताला वेगवान गोलंदाज उमरान मलिकसारख्या युवा खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. उभय संघांमध्ये रविवारी झालेला पहिला सामना पावसामुळे १२-१२ षटकांचा करण्यात आला होता. दुसऱ्या सामन्याच्या वेळीही ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र या सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार नाही, अशी दोन्ही संघांना आशा आहे.

हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दोन सामन्यांच्या या ट्वेन्टी-२० मालिकेची विजयी सुरुवात केली. या सामन्यात तेजतर्रार माऱ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या उमरान मलिकला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. मात्र त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्याने केवळ एक षटक टाकले आणि त्यात १४ धावा दिल्या. परंतु आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा विचार करता उमरानला एका सामन्यानंतरच संघातून वगळले जाणार नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याची कामगिरीत सुधारण्याचा प्रयत्न असेल.  युवा लेग-स्पिनर रवी बिश्नोई आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना संधी देण्याचाही भारतीय संघ विचार करू शकेल. फलंदाजीत दीपक हुडा आणि इशान किशन यांनी पहिल्या सामन्यात प्रभावित केले. त्यामुळे त्यांच्यासह अनुभवी हार्दिक, सूर्यकुमार यादव आणि दिनेश कार्तिक यांच्यावर भारताच्या फलंदाजीची भिस्त असेल.

टेक्टर, स्टर्लिगवर भिस्त

आयर्लंडला ही मालिका बरोबरीत सोडवायची असल्यास दुसऱ्या सामन्यात विजय अनिवार्य आहे. त्यांच्या फलंदाजीची भिस्त पहिल्या सामन्यातील अर्धशतकवीर हॅरी टेक्टर, सलामीवीर पॉल स्टर्लिग आणि कर्णधार अँडी बाल्बर्नी यांच्यावर आहे. गोलंदाजीत क्रेग यंग आणि जोश लिटिल हे वेगवान गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावतील.

भारताची विजयी सलामी 

भारतीय संघाने रविवारी झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात आयर्लंडवर सात गडी आणि १६ चेंडू राखून मात केली. पावसामुळे हा सामना १२-१२ षटकांचा झाला. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर आयर्लंडने ४ बाद १०८ अशी धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून हॅरी टेक्टरने (३३ चेंडूंत नाबाद ६४) अप्रतिम फलंदाजी केली. त्यानंतर भारताने १०९ धावांचे लक्ष्य ९.२ षटकांत तीन गडय़ांच्या मोबदल्यात गाठले. दीपक हुडाने (२९ चेंडूंत नाबाद ४७) महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला इशान किशन (११ चेंडूंत २६) आणि कर्णधार हार्दिक पंडय़ा (१२ चेंडूंत २४) यांची उत्तम साथ लाभली.

ऋतुराज जायबंदी     

भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला पायाच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात फलंदाजी करता आली नाही. दोन सामन्यांमध्ये केवळ एका दिवसाचे अंतर असल्याने ऋतुराज तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात त्याच्या जागी राहुल त्रिपाठी आणि संजू सॅमसन यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकेल.

  • वेळ : रात्री ९ वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, टेन ३