पीटीआय, मलाहाइड : आयर्लंडविरुद्धच्या रविवारपासून सुरू होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाची कसोटी ठरणार आहे. याचप्रमाणे वरिष्ठ क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत झगडणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनच्या कामगिरीकडे निवड समितीचे लक्ष असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत केएल राहुलला दुखापत झाल्यामुळे ऋषभ पंतकडे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु पंत इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी संघात सामील झाल्यामुळे गुजरात टायटन्सला पहिल्याच इंडियन प्रीमियर लीग हंगामात जेतेपद जिंकून देणाऱ्या पंडय़ाकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत दुखापती, भरगच्च कार्यक्रमपत्रिका आणि खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन यामुळे भारताने अनेकांना कर्णधार म्हणून आजमावले आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेच्या निमित्ताने या नेतृत्वक्षम यादीत पंडय़ाच्या नावाचा समावेश झाला आहे.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडमधील कसोटी संघासमवेत असल्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे नव्या खेळाडूंकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.

सूर्यकुमार तिसऱ्या की चौथ्या क्रमांकावर?

पंत आणि श्रेयस अय्यर कसोटी संघात असल्यामुळे संजू सॅमसन आणि दीपक हुडाला स्वत:ला सिद्ध करण्याची उत्तम संधी आहे. अनेक संधी मिळूनही सॅमसनला भारताच्या ट्वेन्टी-२० संघातील स्थान टिकवता आलेले नाही.  दुखापतीतून सावरलेला सूर्यकुमार यादव तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्याची दाट शक्यता आहे. आफ्रिकेविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर इशान किशनने भारताचा राखीव सलामीवीर म्हणून भक्कम दावेदारी केली आहे. परंतु या मालिकेसाठी इशान आणि ऋतुराजवरच सलामीची जबाबदारी असेल. आफ्रिकेच्या दर्जेदार वेगवान माऱ्यापुढे ऋतुराज अपयशी ठरला होता. तेजतर्रार उमरान मलिक आणि ‘यॉर्कर’वीर अर्शदीप सिंग यांना अनुकूल वातावरणात संघात स्थान मिळू शकते.

डोहेनी, ऑल्फर्टचे पदार्पण?

आफ्रिकेप्रमाणे आयर्लंडकडून भारताला कडवा प्रतिकार होण्याची शक्यता कमी आहे. परंतु या मालिकेच्या निमित्ताने जागतिक स्तरावर लक्ष वेधण्याची त्यांना उत्तम संधी मिळू शकते. अँड्रय़ू बालबर्नीच्या नेतृत्वाखालील या संघातील स्टीफन डोहेनी आणि कोनेर ऑल्फर्ट यांना पदार्पणाची संधी मिळू शकते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीतही या भारतीय संघाला कमी लेखून चालणार नाही, हे बालबर्नीने मान्य केले. ‘‘भारतीय क्रिकेट संघाकडे दोन संघ खेळवण्याइतपत सामथ्र्य आहे. आम्ही त्यांच्याप्रमाणे एकाच वेळी कसोटी आणि ट्वेन्टी-२० संघ खेळवण्याचा विचार सध्या तरी करू शकत नाही,’’ असे बालबर्नीने सांगितले.

  • वेळ : रात्री ९ वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, टेन ३
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India ireland twenty20 series rituraj attention samson first twenty20 match ireland ysh
First published on: 26-06-2022 at 00:02 IST