मुंबई : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कारकीर्दीत जवळपास प्रत्येक महत्त्वाची स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे आता तिने फक्त ऑल इंग्लंडचे अजिंक्यपद मिळवावे, असे मत भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले.

‘‘सिंधू भारताची सर्वोत्तम बॅडमिंटनपटू आहे, यात शंका नाही. मात्र ऑल इंग्लंड स्पर्धेला प्रतिष्ठेचे स्थान असल्याने तिने एकदा तरी ही स्पर्धा जिंकावी, असे मला वाटते. या स्पर्धेच्या दृष्टीने तिने अन्य स्पर्धांतून माघार घेतली तरी ते योग्यच असेल,’’ असे १९८०मध्ये ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकणाऱ्या पदुकोण यांनी सांगितले. मंगळवारी वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या सहकार्याने पदुकोण यांनी बॅडमिंटन प्रशिक्षक कार्यक्रमाला प्रारंभ केला.

भारत-पाकिस्तान सामना व्हायलाच हवा!

राजनैतिक संबंध बिघडलेले असले तरी भारत-पाकिस्तान यांच्यातील ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील सामना व्हायला हवा, अशी भूमिका पदुकोण यांनी व्यक्त केली. ‘‘खेळात राजकारण आणू नये, असे माझे वैयक्तिक मत आहे. परंतु हा सामना व्हावा किंवा न व्हावा याबाबत अधिकारवाणीने भाष्य करण्याचा मला अधिकार नाही,’’ असे पदुकोण म्हणाले.