चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयसीसीतर्फे आयोजित मानाच्या स्पर्धांपैकी एक. सुरुवातीला या स्पर्धेचं नाव मिनी वर्ल्डकप असं होतं. काही वर्षांनंतर या स्पर्धेला चॅम्पियन्स ट्रॉफी असं नाव मिळालं. पुरुषांप्रमाणे महिलांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आयोजित करण्याचं आयसीसीने ठरवलं. पुढच्या वर्षी म्हणजे २०२७ मध्ये श्रीलंकेत पहिलीवहिली वूमन्स चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार होती. मात्र श्रीलंकेने आयोजनाचा अधिकार गमावला आहे. आता स्पर्धेचं आयोजन भारतात होण्याची चिन्हं आहेत.

या स्पर्धेत आयसीसी क्रमवारीत अव्वल पाच संघ असणार होते. यजमान या नात्याने श्रीलंकेला सहभागीची संधी मिळणार होती. मात्र आयोजनाचा अधिकार गमावल्याने श्रीलंकेचा सहभाग अनिश्चित झाला आहे. श्रीलंकेचा संघ तूर्तास क्रमवारीत सातव्या स्थानी आहे.

ही स्पर्धा श्रीलंकेत होणार नाही. कुठे होईल सांगू शकत नाही, त्याचा निर्णय आयसीसी घेईल असं श्रीलंका क्रिकेटच्या ट्रान्सफॉर्मेशन कमिटीचे सचिव प्रकाश शफ्तार यांनी सांगितलं. आयोजन गमावल्यामुळे श्रीलंकेला मोठा आर्थिक फटकाही बसणार आहे.

श्रीलंका बोर्डाने का गमावला आयोजनाचा अधिकार

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं कामकाज सध्या सरकारतर्फे नियुक्त ट्रान्सफॉर्मेशन कमिटीतर्फे चालवला जातो. बोर्डाच्या घटनेत योग्य बदल आणि नियमन यंत्रणा निर्माण करण्यासाठी सरकारने या समितीची स्थापना केली आहे.

राजकीय पक्षांनी किंवा व्यवस्थेद्वारे नियुक्त कोणत्याही अंतरिम प्रशासनाला आयसीसीतर्फे ग्राह्य मानलं जात नाही. यामुळेच आयसीसीच्या बैठकांना श्रीलंका क्रिकेटच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नाही. ट्रान्सफॉर्मेशन कमिटीने कारभार स्वीकारल्यापासून आयसीसीमधलं श्रीलंकेचं प्रतिनिधित्व संपष्टात आलं आहे.

आयसीसीने जुलै महिन्यातच आपली भूमिका स्पष्ट स्पष्ट केली होती. श्रीलंका क्रिकेट संदर्भात आम्हाला माहिती मिळाली आहे. बोर्डाची घटना सुधारण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याचं समजलं. लवकरात लवकर निवडणूक व्हावी जेणेकरून बोर्डाचे नियुक्त प्रतिनिधी असतील. जोवर हे होत नाही तोवर आयसीसीच्या बैठकीत श्रीलंका क्रिकेटचं कुणीही उपस्थित राहू शकत नाही.

बोर्डाच्या घटनेतल्या प्रस्तावित सुधारणा कायदेशीर प्रक्रियेतून जाणं बाकी आहे. त्यानंतर या सुधारणांचा प्रस्ताव श्रीलंकेच्या संसदेत मांडण्यात येईल. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने श्रीलंका बोर्डाचे पदाधिकारी नियुक्त व्हायला काही महिने लागू शकतात. २०२३ मध्येही आयसीसीने श्रीलंकेसंदर्भात असाच निर्णय घेतला होता. U19 वर्ल्डकपच्या आयोजनाचे अधिकार श्रीलंकेकडे होते. मात्र बोर्डाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. अंतरिम समितीकडे कारभार सोपवण्यात आला होता.

आयसीसीतर्फे कोणत्या स्पर्धा आयोजित केल्या जातात?

वनडे वर्ल्डकप, टी२० वर्ल्डकप, U19 वर्ल्डकप, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा चार स्पर्धा आयसीसीतर्फे आयोजित केल्या जातात. वनडे वर्ल्डकप दर चार वर्षांनी होतो. टी२० वर्ल्डकप दर दोन वर्षांनी होतो. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. U19 वर्ल्डकप दोन वर्षांनी होतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही दोन वर्ष चालणारी स्पर्धा आहे.