भारतीय संघाचा फिरकीपटू आर.अश्विनच्या फिरकीचा धसका विविध संघांताली फलंदाजांनी घेतला आहे. अश्विनने आजवर आपल्या फिरकीने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली आहे. गोलंदाजीसोबतच अश्विन फलंदाजीतही भारतीय संघासाठी अनेकदा तारणहार ठरला आहे. अश्विनने संघ संकटात असताना मैदानात जम बसवून आपल्यातील फलंदाजी कौशल्यानेही अनेकांची मने जिंकली आहेत. संघाचा मुख्य फिरकीपटू देखील शतकी खेळी साकारण्याची कुवत ठेवू शकतो, हे अश्विनने सिद्ध करून दाखवले आहे. अश्विनच्या याच अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय संघातील त्याचे स्थान आजवर अढळ राहिले आहे. अश्विनच्या गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक क्रिकेटपटूंकडून कौतुक केले गेले. पाकिस्तानचे माजी गोलंदाज वकार युनूस यांनी नुकतेच ‘द हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना अश्विनवर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले की, अश्विनसारख्या जिज्ञासू गोलंदाजाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. अश्विन एक उत्तम गुणवत्तेचा गोलंदाज आहे, यात मुळीच दुमत नाही. अश्विनसारखा अष्टपैलू खेळाडू संघात असणे हे भारतीय संघाचे नशीब आहे. आपल्या उल्लेखनीय कामगिरीने अश्विन आपल्या कारकीर्दीत नव्या विक्रमांची नोंद करत आहे. याचा मला आनंदच आहे, असेही वकार युनूस म्हणाले.
अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत दहा विकेट्स मिळवून कसोटी कारकीर्दीतील २०० विकेट्स टप्पा गाठला. अश्विनने केलेल्या विक्रमाबद्दल युनूस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर अश्विनचे शुभेच्छा दिल्या. त्यावर अश्विनने यानेही ट्विटकरून वकार युनूस यांचे आभार व्यक्त केले.