टी२० वर्ल्डकपच्या वेळापत्रकानुसार, दुसरा सेमी फायनलचा सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सीडिंग्जनुसार भारतीय संघ हा सामना खेळणार आहे. मात्र पाकिस्तानने सुपर८चा टप्पा पार करून सेमी फायनल गाठल्यास हे चित्र बदलू शकतं.
सुपर८ गटाची पहिली लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांना प्रत्येकी एकेक गुण विभागून देण्यात आला. पाकिस्तानला उर्वरित दोन लढतीत विजय मिळवणं अनिवार्य आहे. पाकिस्तानने सुपर८चा अडथळा पार करून सेमी फायनल गाठल्यास त्यांचा मुकाबला भारतीय संघाशी होऊ शकतो. अशा परिस्थितीत दुसरी सेमी फायनल मुंबईऐवजी श्रीलंकेतल्या कोलंबो इथे खेळवण्यात येईल. भारत-पाकिस्तान मधील संबंध दुरावल्यामुळे पाकिस्तानचा संघ भारतात येत नाही. यामुळे टी२० वर्ल्डकप स्पर्धेतला प्राथमिक फेरीतला सामना कोलंबो इथे खेळवण्यात आला होता. भारतीय संघाने हा सामना जिंकत आगेकूच केली.
भारताने सुपर८ गटात अव्वल स्थान राखले आणि अन्य गटात पाकिस्तानने दुसरे स्थान मिळवले तर भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा समोरासमोर येऊ शकतात. याउलट झाल्यास म्हणजे पाकिस्ताने सुपर८ गटात अव्वल स्थान आणि भारतीय संघाने दुसऱ्या गटात दुसरे स्थान पटकावलं तरी हे दोन संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. तसं झाल्यास ५ मार्चला होणारी सेमी फायनलची दुसरी लढत मुंबईऐवजी कोलंबो इथे खेळवण्यात येईल.
आयसीसीने स्पर्धेआधी जारी केलेल्या पत्रकानुसार, भारत आणि पाकिस्तानचे संघ सेमी फायनलमध्ये समोरासमोर असतील तर हा सामना मुंबईऐवजी कोलंबो इथे खेळवण्यात येईल. भारतीय संघाविरुद्ध अन्य संघ आल्यास तो सामना ५ तारखेला मुंबईत होईल.
२०२७ पर्यंत ठरलेल्या हायब्रिड व्हेन्यू करारानुसार, भारत-पाकिस्तान संघ आयसीसी स्पर्धांमध्ये समोरासमोर आल्यास तटस्थ ठिकाणी सामना खेळवण्यात येईल.
पाकिस्तानच्या संघाने टी२० वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार घातला होता. आयसीसीची मध्यस्थी आणि आर्थिक नुकसानीची शक्यता यामुळे पाकिस्तानने अखेर भारताविरुद्धचा सामना खेळायचा निर्णय घेतला.
