india men beat second seed germany in world table tennis championships zws 70 | Loksatta

जागतिक टेबल टेनिस स्पर्धा : भारतीय पुरुष संघाचा जर्मनीला पराभवाचा धक्का

जागतिक क्रमवारीत ३७ व्या स्थानावर असणाऱ्या साथियनने एकेरीतील आपल्या दोन्ही लढती जिंकल्या.

जागतिक टेबल टेनिस स्पर्धा : भारतीय पुरुष संघाचा जर्मनीला पराभवाचा धक्का
जी. साथियन

चेंगडू : तारांकित खेळाडू अंचता शरथ कमलच्या अनुपस्थितीत जी. साथियनने केलेल्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर भारतीय पुरुष संघाने रविवारी जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या जर्मनीला ३-१ असा पराभवाचा धक्का दिला.

जागतिक क्रमवारीत ३७ व्या स्थानावर असणाऱ्या साथियनने एकेरीतील आपल्या दोन्ही लढती जिंकल्या. त्याने जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या डँग क्वियूवर मिळवलेला विजय लक्षवेधी ठरला. पहिल्या एकेरीच्या लढतीत साथियनने डुडा बेनेडिक्टचा ११-१३, ४-११, ११-८, ११-४, ११-९ असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या लढतीत त्याने क्वियूला १०-१२, ७-११, ११-८, ११-८, ११-९ असे हरवले. या दोन्ही लढतींत साथियनने पहिले दोन्ही गेम गमावले होते. परंतु त्याला दमदार पुनरागमन करण्यात यश आले.

हरमीत देसाईने क्वियूकडून ७-११, ९-११, १३-११, ३-११ असा पराभव पत्करला. मात्र, मानव ठक्करने आपल्यापेक्षा वरच्या मानांकित रिकाडरे वॉल्थरला १३-११, ६-११, ११-८, १२-१० असे नमवले. भारतीय पुरुष संघाचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. भारतीय संघाला बाद फेरीत प्रवेश करायचा असल्यास त्यांना गटात पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवावे लागेल. दरम्यान, पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागलेल्या भारताच्या महिला संघाने दुसऱ्या सामन्यात उझबेकिस्तानला ३-० असे पराभूत केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-10-2022 at 02:37 IST
Next Story
पाटीदार, मुकेशला संधी ; आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा